तिसऱ्या दिवशीच वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास,भारत डावाने विजयी

राजकोट : टीम इंडीया आणि वेस्ट इंडीजमध्ये दोन कसोटी सामन्यांची सिरिज सुरु आहे. यातील पहिल्या सामन्यात टीम इंडीयाने वेस्ट इंडीजला धूळ चारली आहे. पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा हा निकाल लागलाय. वेस्ट इंडीजचा दुसरा डाव 196 धावात गुंडाळून एक डाव आणि 272 रन्सने मात दिली आहे. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ 181 धावात संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात केलेल्या 649 धावांच्या डोंगरापुढे वेस्ट इंडिजला निम्मी धावसंख्याही उभारता आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर फॉलऑनची नामुष्की आली होती. तर दुसऱ्या डावातही विंडीजच्या खेलाडूंना जास्त चमक दाखवता आली नाही.

भारताकडून दुसऱ्या डावात कुलदीप यादवने ५, रविंद्र जाडेजाने ३ तर रविचंद्रन आश्विन २ विकेट घेतल्या. या मालिकेतला दुसरा सामना १२ ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे सुरु होणार आहे.

संक्षिप्त धावफलक-

भारत पहिला डाव- 9 बाद 649 धावा (घोषित)

विंडिज पहिला डाव – सर्वबाद 181 धावा

विंडिज दुसरा डाव – सर्वबाद 196 धावा