#MeToo : अर्जुन रणतुंगावर लैंगिक छळाचा महिला कर्मचाऱ्याचा आरोप

हॉलिवूडमधून सुरू झालेली #MeToo मोहिम आता बॉलिवूडमध्येही पसरली आहे. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे. #MeToo मोहिमेतंर्गत वेगवेगळया क्षेत्रातील महिला त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक जबरदस्तीच्या घटनांना वाचा फोडत असताना आता आणखी एक असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

भारतात हवाई क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगावर लैंगिकसुखासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे.काही वर्षांपूर्वी श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर असताना मुंबईतील हॉटेलमध्ये ही घटना घडली होती असा दावा महिलेने केला आहे. या महिलेने फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून ही घटना कशी घडली त्याची माहिती दिली आहे तसेच तिला अन्य लोकांनी लैंगिक सुखासाठी कसा त्रास दिला त्याची माहिती सुद्धा तिने दिली आहे.अर्जुन रणतुंगा सध्याच्या श्रीलंकेतील सरकारमध्ये पेट्रोलियम खात्याचा मंत्री आहे.