पुणे – पुण्यातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील एक मोठे होर्डिंग दुपारी दीडच्या सुमारास कोसळले असून यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेत रस्त्यावरील वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
होर्डिंग कटिंगचे काम सुरू असताना दुपारी 1 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास होर्डिंग तुटून खाली पडले. या होर्डिंगखाली सात जण सापडले. या मृतांमध्ये एक रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराचा समावेश आहे. हे होर्डिंग रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे असल्याची माहिती समोर येत आहे.
रेल्वेच्या जागेतील होर्डिंग कापण्याचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरू असताना ही दुर्घटना झाली असून या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी केली आहे.