ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणार – नितीन राऊत

नितीन राऊत

नागपूर – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य इशारा पाहता ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट व सुसज्ज् करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज केले.

आज ग्रामीण भागातील बोरखेडी ग्रामपंचायत, बुटीबोरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील लसीकरण केंद्र,भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय व रिसर्च सेंटरला त्यांनी भेट देवून पाहणी केली.

यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार  ॲङ अभिजीत वंजारी, विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिपक सेलोकार, उपविभागीय अधिकारी इंदिरा पखाले उपस्थित होत्या.

कोविडची दुसरी लाट ओसरत असली तरी गाफील राहून चालणार नाही असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, लसीकरणानेच कोरोनावर मात करता येईल. लसीकरणाविषयीचे अनेक गैरसमज असल्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरणाचा टक्का कमी आहे. तो वाढविण्यासाठी  व्यापक प्रयत्नांची गरज आहे.ग्रामीण भागात आशा,अंगणवाडी सेविका या तळातल्या घटकांनी उत्तम कामगिरी बजावली आहे.

औदयोगिक प्रशिक्षण संस्था बुटीबोरी येथील लसीकरण केंद्राला त्यांनी भेट दिली. तेथील लसीकरण केंद्रावरील डॉ.संगीता घोंगे यांच्याशी संवाद साधून लसीकरणाची माहिती घेतली. लसीकरण करतांना नागरिकांच्या मनात असलेले प्रश्न किंवा भीती कमी करण्यासाठी त्यांच्याशी सुसंवाद करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय व रिसर्च सेंटरच्या परिसराची पाहणी त्यांनी केली.येथे 100 बेड क्षमतेचे कोविड केयर सेंटर उभारण्याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली. प्राचार्य डॉ.मोहन येण्डे  यांनी महाविद्यालय व रिसर्च सेंटरच्या कामाची माहिती दिली. तसेच सौम्य लक्षणे असलेल्या व गृह विलगीकरणातील बाधितांसाठी आयुष मंत्रालयाच्या वतीने निशुल्क आयुष -64 गोळ्यांच्या वितरणाची माहिती दिली. रूग्णांची कोविड टेस्ट पॉझीटिव्ह असल्याचा रिपोर्ट बघून नातेवाईकांना आयुष -64 गोळ्या उपलब्ध करून दिल्या जातात.

म्युकरमायकोसिसच्या जनजागृतीसाठी वरीष्ठ अधिकारी  गावागावात  जात आहेत.या अधिकाऱ्यांच्या  कामाची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी घेतली.माझे कार्यक्षेत्र -माझी जबाबदारी या संकल्पनेनुसार अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.नुकताच 23 मे रोजी पालकमंत्रयांनी रामटेक-देवलापार-नागपूर ग्रामीण तालुक्याचा दौरा केला होता. आरोग्य यंत्रणेच्या पाहणीसोबत त्यांना संवादातून प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य सुसज्जता तपासण्यावर पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांचा भर आहे.

महत्वाच्या बातम्या –