चाळीसगाव तालुक्यातील जलयुक्त शिवाराची कामे जिल्ह्यात रोल मॉडेल ठरणार – राम शिंदे

जळगाव- चाळीसगाव येथील शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून या अभियानामुळे महाराष्ट्राची देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात आमदार उन्मेश पाटील व सहकाऱ्यानी घेतलेल्या मेहनतीमुळे निश्चितपणे ही कामे जिल्ह्यात रोल मॉडेल ठरतील, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. तालुक्यातील वाघळी येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यांची पाहणी करताना ते बोलत होते.

जलसंधारण विभागामार्फत चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे 47.70 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधारा व वाघळी येथील मधुई देवी जवळ 47.61 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यांच्या फलकाचे अनावरण शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बंधाऱ्यातील पाण्याचे जलपुजन करण्यात आले. शिंदे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील साठलेले पाणी पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. या अभियानामुळे परिसरातल्या विहीरींच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा विकास होणार आहे. शेतकरी समृध्द झाला तर देश समृध्द होईल म्हणून राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेवून आपला विकास साध्य करावा असेही त्यांनी सांगितले.