जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची पहिली यादी प्राप्‍त

टीम महाराष्ट्र देशा –  महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खातेदार असलेल्या एक हजार 77 शेतकर्‍यांची कर्जमाफीची पहिली यादी गुरुवारी बँकेच्या मुख्य शाखेला प्राप्त झाली आहे. पडताळणी झाल्यावर कर्जमाफीची आठ कोटी 28 लाखांची रक्कम या शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रला पहिल्या यादीतील पात्र शेतकर्‍यांसाठी सुमारे 30 कोटी रुपये प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या ग्रीन याद्या आता थेट बँकांकडे येण्यास सुरुवात झाली आहे. जालना जिल्हा ग्रामीण बँकेच्या 26 शाखांमधील एक हजार 77 शेतकर्‍यांची पहिली यादी प्राप्त झाली आहे. या शेतकर्‍यांचे एकूण 8 कोटी 28 लाख 91 हजार 357 रुपयांचे कर्ज माफ केले जाणार आहे. असे ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक रत्नाकर केसकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांच्या मिळून 28 शाखा आहेत. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात 64 शाखा आहेत. बँक ऑफमहाराष्ट्राला जिल्ह्यातील पहिल्या ग्रीन यादीतील कर्जदार शेतकर्‍यांसाठी 30 कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे