जायकवाडी प्रकल्पाचे नाव ‘नाथसागर’ होणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन

जायकवाडी धरण

औरंगाबाद : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे नाव नाथसागर करण्यात येईल असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पैठणकरांना दिले आहे. राष्ट्रवादी परिवार परिसंवाद बैठकीसाठी जयंत पाटील पैठण येथे आले होते. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे. परिसंवादासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली. त्यामुळे परिसंवाद मेळावा वेळेवर रद्द करत जयंत पाटलांचा ताफा घनसावंगीकडे रवाना झाला.

जायकवाडी प्रकल्पाच्या जलसाठ्यास नाथसागर हे नाव दिलेले असून प्रकल्पासही नाथसागर हेच नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी पैठणकरांची आहे. पैठण येथील माहेश्वरी भक्त निवासात प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी परिवार परिसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संत एकनाथांच्या जन्म व कर्मभूमीत असलेल्या जायकवाडी प्रकल्पाचे नाव नाथसागर करावे अशी पैठणकरांची मागणी आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख दत्ता गोर्डे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कानावर घातली. तातडीने मागणी मान्य करत पाटील यांनी या बाबत आश्वासन दिले. दरम्यान, जायकवाडी प्रकल्प माजलगाव तालुक्यातील जायकोवाडी येथे मंजूर करण्यात आला होता. परंतु पैठणचे भूमिपुत्र माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दूरदृष्टीने हा प्रकल्प पैठण येथे उभारण्याचा निर्णय घेऊन पैठण परिसरात जायकवाडी वसाहत उभी करून हा प्रकल्प उभा केला.

महत्वाच्या बातम्या –