जाणून घ्या डाळिंब लागवडीची पद्धत

डाळिंब हे अतिशय कणखर, काटक व अवर्षणप्रवण क्षेत्रात खडकाळ जमिनीतही चांगला प्रतिसाद देणारे फळपीक आहे. उत्तम व्यवस्थापन करून व्यापारी तत्त्वावर लागवड केल्यास भरपूर नफा मिळवता येतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, जालना, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांमध्ये व्यापारी तत्त्वावर डाळिंबाची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचे जवळपास 1.20 लाख हेक्टर क्षेत्र आहे. डाळिंबाचा रस थंड व उत्साहवर्धक असून त्यामध्ये औषधी गुणधर्मही आहेत.
हवामान : डाळिंबाचे पीक सर्वसाधारण कोरड्या व समशीतोष्ण हवामानात चांगल्या प्रकारे येते. डाळिंबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी व उत्पादनक्षमतेसाठी तसेच चांगल्या प्रतीची फळे मिळवण्यासाठी वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कमी असणे आवश्यक आहे. दमट हवामानात फळावर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. फळांच्या पूर्ण वाढीनंतर आर्द्रता वाढल्यास फळास वरून व आतून चांगला रंग येतो.
जमीन : डाळिंबास हलकी ते मध्यम जमीन चालते. डोंगरउताराची, माळरानाची जमीनही या फळपिकास चालते. नदीकाठची, गाळाची व चांगला निचरा होणारी जमीन या पिकास अगदी उपयुक्त होते. 0.5 मीटर खोलीची व त्याखाली मुरमाड जमीन असली तरी झाडे चांगली वाढू शकतात. भारी व काळ्या जमिनीतही फळझाडांची वाढ चांगली होते. परंतु अशा जमिनीतून पाण्याचा उत्तम निचरा होणे अत्यावश्यक बाब आहे, अन्यथा फळांना चांगला रंग येत नाही. डाळिंबाचे झाड थोड्या खारवट जमिनीतही (सामू 8-5) येऊ शकते, पण क्षाराचे प्रमाण जास्त असल्यास झाडाची योग्य प्रमाणात वाढ होत नाही.
लागवड : डाळिंबाची लागवड गुटी कलमाने तयार केलेल्या रोपांपासून करतात. रोपे निवडताना ती खात्रीशीर रोपवाटिकेतून, रोगविरहित व जोमदार असावीत. प्रत्येक खड्ड्याच्या मधोमध एक रोप लावून बाजूने माती घट्ट दाबून पाणी द्यावे. बांबू किंवा काठी रोवून कलमांना आधार द्यावा. नंतर जमिनीलगत येणारी फूट काढून जमिनीपासून 15-20 सेंमी. उंचीवर 4 ते 5 चांगल्या फांद्या राखाव्यात. लागवडीपासून एक ते दीड वर्षात झाडाची चांगली डेरेदार वाढ होऊन फुले धरायला लागतात. झाडाची चांगली वाढ झालेली असल्यास झाडाच्या कुवतीप्रमाणे थोडी (8 ते 12) फळे ठेवण्यास हरकत नाही. पण झाड कमकुवत असल्यास फुले तोडून टाकून झाडाच्या वाढीला मदत करावी.
उत्पादन व साठवण : चांगल्या दर्जाची फळे मिळवण्यासाठी फळांची विरळणी करणे, वाढीची अवस्था लक्षात घेऊन मोजकीच फळे झाडावर ठेवणे याला फार महत्त्व आहे. 5 ते 6 वर्षे वयाच्या डाळिंब बागेतील एका झाडापासून 70 ते 80 फळे घेणे योग्य आहे. झाडे 8 ते 10 वर्षांची झाल्यावर प्रत्येक झाडापासून 150 ते 200 फळे मिळतात. बुरशीनाशक औषधांची पूर्वप्रक्रिया केलेली फळे 70 सें. तापमानात 90 दिवस चांगल्या स्थितीत साठवता येतात.