मोहराला अनुकूल वातावरण नसल्याने हापूसचा हंगाम दीड महिने लांबला

हापूस आंबा

कोकणात ऑक्टोबर महिन्यात पाऊस जातो. ऑक्टोबर हिटमुळे जमीन तापते आणि त्यामुळे कलमांना ताण मिळतो. या वेळी मतलई वारे सुटतात. वापसा, मतलई वारे आणि थोडी थंडी ही कलमांना मोहर येण्यासाठी अनुकूल परिस्थिती असते. परंतु, यावर्षी मोहर येण्यास वातावरण प्रतिकूल आहे. प्रतिकूल वातावरणाचा परिणाम हा हापूसवर होणार असून, अर्थकारण बिघडणार, हे निश्चित झाले आहे. पाऊस अजूनही गेलेला नसल्याने तापमानही जास्त आहे. जोपर्यंत पाऊस थांबणार नाही तोपर्यंत मतलई वारे सुरू होणार नाही. हंगामास अनुकूल वातावरण नसल्याने मोहर दीड ते दोन महिना लांबण्याची चिन्हे दिसत आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.

उशिरा मोहरआल्यावर फळाच्या काढणीसाठीही वेळ होणार आहे. जर जानेवारी महिन्यात थंडी एकसारखी पडली, तर पुढे एकदम फळ तयार होणार आहेत. यामुळे एकाचवेळी सर्व ठिकाणचा आंबा बाजारात येणार. त्यामुळे त्यांच्या दरावरही परिणाम होणार आहे. ही परिस्थिती पावसाचा मुक्काम लांबल्याने ओढवणार आहे. त्यामुळे उत्पन्नात २५ टक्यांनी घट होईल, अशी भीती बागायतदारांकडून वर्तविली जात आहे.

दरवर्षी पहिल्यांदा देवगड खाडीजवळच हापूस आंबा बाजारात येतो. त्यानंतर राजापूर खाडी, रत्नागिरी खाडी, जयगड खाडी आणि त्यापुढे अन्य खाडीकिनारी परिसरातील आंबा बाजारात येतात. पण यावर्षी हे चित्र बदलणार आहे. एप्रिल महिन्यात हापूसच्या बरोबरीने कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर भारतातील आंबा बाजारात दाखल होतो. त्यामुळे दरावर परिणाम होणार आहे.

पावसासोबतच हिवाळ्यात तापमान स्थिर राहणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत मिळणाऱ्या अंदाजावरून यंदा दोन अंश सेल्सिअसने तापमान कमी राहील, अशी शक्यता आहे. तसेच, किडींचाही प्रादुर्भाव वाढणार असून, फवारण्यांचा कालावधी कमी करावा लागणार आहे आणि त्यामुळे उत्पादनाला फटका बसणार आहे. दोन फवारणीतील अंतर हे १५ दिवस ते तीन आठवडे असते. परंतु प्रतिकूल हवामानामुळे यंदाच्या वर्षी फवारणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोकणात आंबा उत्पादनातून वर्षाला सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल होते. त्यात एकट्या रत्नागिरी जिल्ह्याची उलाढाल सुमारे १२०० कोटी आहे. त्यामध्ये आंबाविक्रीतून ९०० ते १००० कोटी तर आंबा प्रक्रिया उत्पादनातून साधारणपणे दोनशे कोटीवर उलाढाल होते. पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात मोहर न आल्याने फेब्रुवारीतील उत्पन्नावर बागायतदारांना पाणी सोडावे लागले आहे.

महत्वाच्या बातम्या –

मोदी सरकार 34 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता

कर्नाटकातील जनता दल सेक्युलर काँग्रेसचे आघाडी सरकारचा आज फैसला

पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा सूचवण्याच्या दृष्टीने बुधवारी पुण्यात व्यापक बैठक
Loading…