‘या’ जिल्ह्यात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेला सुरुवात

पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोनाच्या नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम शासनातर्फे सुरू करण्यात आली असून, गृहभेटी, तपासणी, संशयितांचा शोध व उपचार मिळवून देणे आदी कामे या मोहिमेद्वारे होणार आहेत.

राज्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात सर्वदूर ही मोहीम राबविण्यात येत असून, हाय रिस्क रूग्णांचा, तसेच संशयितांचा शोध घेणे व त्यांना योग्य उपचार मिळवून देणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांच्यासह शासनाचे विविध विभाग, महापालिका व सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून प्रत्येक घरी पोहोचून माहिती संकलन, तपासणी केली जाणार आहे.

योग्य सर्वेक्षण केले तरच ही मोहीम यशस्वी होऊ शकते. त्यामुळे या मोहिमेंतर्गत सर्वेक्षणात कोणतीही त्रुटी असता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी  प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. ग्रामीण व नागरी भागातील सर्वेक्षणात रुग्णांची अचूक माहिती तसेच हाय-रिस्क व लो-रिस्क रुग्णांचे वर्गीकरण व्यवस्थित करून वस्तुस्थितीदर्शक आकडेवारी प्राप्त करावी व रुग्णांना वेळीच उपचार मिळवून द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

ही मोहीम पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान आणि दुस-या टप्प्यात 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत.  मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक शहरातील, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी करणार आहेत.  त्याचप्रमाणे, लोकांना आरोग्य शिक्षण व महत्वाचे आरोग्य संदेश देणे, तसेच संशयित कोरोना रूग्णांचा शोध घेणे व त्यांना उपचारासाठी संदर्भ सेवा पुरविणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनीविकार, लठ्ठपणा व उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे कोरोना रूग्णांच्या संपर्कात आालेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

नागरिकांना आवाहन

नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणा-या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. आरोग्य पथकाला सहकार्य करावे. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांसह संपूर्ण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –