ऊस उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर का करावा….घ्या जाणून

ऊस

ऊस ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. मुख्यत्वे, गुळ,  साखरेसाठी पिकवण्यात येते. ऊस भारत व ब्राझील या देशात प्रामुख्याने पिकवण्यात येतो. भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत. ऊस या वनस्पतीला संस्कृृृतमध्ये इक्षुुदंड असे नाव आहे.

ऊस हे वार्षिक पीक आहे. ऊसाच्या पेरापासून (खोडाच्या तुकड्यापासून) नवीन रोप लावतात. ऊसाला काळी कसदार जमीन लागते, कारण ऊसाला खूप पोषकद्रव्ये लागतात. लागण व खोडवा या ऊस पिकवण्याच्या २ पद्धती आहेत. ऊसापासून मोठया प्रमाणात साखराचे उत्त्पादन घेतले जाते. ऊसावर हवामानातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आणि सुर्यप्रकाश या घटकांचा परिणाम होतो. ऊस लवकर उगवणीसाठी वातावरणातील तापमान १० डी. सेल्सिअसपेक्षा कमी नसावे. वाढीच्या अवस्थेत उसाला २५ डी. ते ३५ डी. से. च्या दरम्यान तापमान, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता व चांगला सुर्यप्रकाश उपयुक्त ठरतो.

साधारणपणे ज्या जमिनीत सातत्याने ऊस लागवड असते, सेंद्रीय खतांचा कमी वापर, रासायनिक खतांचाच वापर केला जातो, अशा जमिनीतून सूक्ष्मअन्नद्रव्यांचे शोषण जादा झाल्यामुळे जमिनीत त्यांची कमतरता भासते. ऊस उत्पादन वाढीसाठी लक्षणे ओळखून शिफारशीत मात्रेमध्ये सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करताना ते जसेच्या तसे जमिनीत घालू नयेत. सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते ही शेणखतात 1ः10 या प्रमाणात मिसळून दिल्यास जास्त फायद्याचे ठरते. यासाठी एक किलो सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत चांगले कुजलेल्या दहा किलो शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून त्यावर पाणी शिंपडावे व पाच ते सहा दिवसांनी चांगले मुरल्यावर ते रासायनिक वरखतांच्या मात्रेसोबत जमिनीत चळी घेऊन द्यावे, त्यामुळे जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी काय करायला हवे तसेच त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कसा करायला हवा ते आज आपण पाहुयात….

लोह –

कार्ये – 

 • हरितद्रव्ये तयार करण्यासाठी उपयुक्त.
 • पानांचा गडद हिरवा रंग बनविण्यास मदत.
 • इतर अन्नद्रव्यांच्या शोषणात मदत करतो.
 • झाडांच्या वाढीस व प्रजननास आवश्यक.

कमतरता लक्षणे –

 • नवीन पाने पिवळी दिसतात, शिरा हिरव्या दिसतात.
 • लक्षणे प्रथमत: वरील भागातील पानावर आढळून येतात.
 • पाने पांढूरकी होउन शेवटी वाळून जातात.

जस्त –

कार्ये –

 • प्रथिने व वितंचके (एन्झाईम) निर्मीतीस आवश्यक घटक.
 • पिकांच्या वाढ करणाऱ्या प्रेरकांच्या वाढीसाठी आवश्यक.
 • वनस्पतीमध्ये इंडोल ॲसिटीक ॲसिड (आ.ए.ए) तयार होण्यासाठी ट्रिव्होफेनच्या निर्मितीची आवश्यक असते. त्यासाठी जस्त आवश्यक.
 • संप्रेरक द्रव्ये (हार्मोन्स) तयार होण्यास मदत करतो. प्रजनन कियेमध्ये आवश्यक.

कमतरता लक्षणे –

 • पानात हरितद्रव्यांचा अभाव दिसू लागतो, शिरा हिरव्याच राहतात.
 • करपलेले ठिपके व तांबडे डाग पानाच्या शिरा, कडा व टोके यावर तसेच सर्व पानांवर विखुरलेल्या स्वरूपात दिसतात.
 • उसामध्ये कांड्या आखुड पडतात.

बोरॉन –

कार्ये –

 • कॅल्शियम विद्राव्य स्थितीत राहण्यास व त्याचे स्थलांतर होण्यास मदत.
 • नत्राचे शोषण करण्यास मदत.
 • पेशी आवरणाचा घटक असून पेशी विभाजनास मदत.
 • आवश्यकतेनुसार साखरेचे स्थलांतर घडवून येण्यास मदत.
 • वनस्पतीमध्ये पाण्याचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक.

कमतरता लक्षणे –

 • पाने ठिसूळ बनून गुंडाळली जातात.
 • उसाचा शेंडा पिवळा पडतो, नंतर तो तांबूस काळा पडून वाळतो.
 • शेंडयाकडील कोवळ्या पानांवर पाण्याचे लहान लहान पारदर्शी ठिपके दिसतात.

ऊस पिकावर सुक्ष्म अन्नद्रव्यांमुळे होणारे परिणाम –

 • पिकांच्या पानामध्ये हरितद्रव्ये तयार करण्यास मदत करतात त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते.
 • पिकांच्या वाढीसाठी लागणारे संयुजके तयार करण्यास मदत करतात.
 • नत्र आणि पिष्ठमय पदार्थांच्या चयापचयाच्या क्रियेत मदत करतात.
 • पिकांमध्ये जीवनसत्त्वे तयार करण्यास मदत करतात.
 • मुळांची वाढ होण्यास मदत करतात.
 • पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
 • ऊसाच्या साखर उताऱ्यात वाढ होते.
 • ऊस उत्पादनात वाढ होते.

महत्वाच्या बातम्या –