चार कॅमेर्‍यांनी युक्त लेनोव्हो एस ५ प्रो स्मार्टफोन

चार कॅमेर्‍यांनी युक्त लेनोव्हो एस ५ प्रो स्मार्टफोन 0a4c43f2ed2d5dc1209ce8a10b4e6542 1

लेनोव्हो कंपनीने चार कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा एस ५ प्रो हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे.

सध्या काही मॉडेल्सच्या मागे आणि पुढे ड्युअल कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात येत आहे. साधारणपणे ड्युअल कॅमेर्‍यांमध्ये एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असतो. यामुळे अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा घेता येतात. यातून घेतलेले फोटो हे अधिक सजीव वाटतात. या अनुषंगाने फ्रंट कॅमेर्‍यांमधील ड्युअल कॅमेरा सेटअप हा सेल्फी प्रतिमांना सजीवपणा देणारा ठरत असल्यामुळे हा प्रकारदेखील युजर्सला भावत आहे. याचमुळे आता बर्‍याच कंपन्या पुढील बाजूसही दोन कॅमेर्‍यांची सुविधा देत आहेत.लेनोव्हो कंपनीने अलीकडेच अनावरण केलेल्या एस ५ प्रो या मॉडेलमध्येही याच प्रकारात अर्थात पुढे आणि मागे ड्युअल कॅमेरे दिलेले आहेत. म्हणजेच यात एकूण चार कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात आलेला आहे. याच्या अंतर्गत मागील बाजूस २० आणि १२ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे प्रदान करण्यात आलेले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २० आणि ८ मेगापिक्सल्सचे कॅमेरे दिलेले आहेत. या दोन्ही कॅमेर्‍यांमध्ये आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारे फिचर्स दिलेले आहेत. यात विविध फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, लेनोव्हो एस५ प्रो या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २२६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६३६ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडीच्या मदतीने वाढविता येणार आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीवर चालणारे असून यावर लेनोव्हो कंपनीचा झेडयुआय ५.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. तर यामध्ये ३,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.
हा स्मार्टफोन पहिल्यांदा चीनमध्ये मिळणार आहे. अर्थात लवकरच याला भारतात लाँच करण्यात येणार असून याचे मूल्य १५ हजारांच्या आत असेल अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे.