‘सुजलाम-सुफलाम महाराष्ट्र घडवू या’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १ :-  महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम घडवायचा आहे. त्याच दिशेने पावले टाकत आपण शेतकऱी स्वावलंबी व्हावा यासाठी तसेच कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण राबवित आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कृषी दिनाच्या तसेच कृषी विभागातर्फे १ ते ७ जुलै दरम्यान आयोजित कृषी संजीवनी सप्ताहाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, महाराष्ट्राला अन्न-धान्याच्या उत्पादनात स्वयंपुर्ण करण्याचा वसंतराव नाईक यांचा निर्धार होता, आणि तो त्यांनी कुशलतेने पूर्ण केला. ते हाडाचे शेतकरी आणि कृषीतज्ज्ञ होते. त्यांनी शेती आणि सिंचन क्षेत्राच्या आपल्या अभ्यासाचा राज्याच्या धोरणात प्रभावीपणे उपयोग केला. यातूनच सिंचन क्षेत्र वाढले आणि शेती उत्पादनात महाराष्ट्र स्वयंपूर्ण ठरला. त्याअर्थाने ते महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे प्रणेते आहेत.

कृषीमंत्री, महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपला असा ठसा उमटवला आहे. त्यांनी महाराष्ट्राला समृद्ध आणि वैभवशाली करण्याची पेरणी केली आहे. त्याच दिशेने पावले टाकत आपण शेतकऱी स्वावलंबी व्हावा यासाठी तसेच कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण राबवित आहोत. यातून महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू या. हेच वसंतराव नाईक यांना आजच्या कृषी दिनी विनम्र अभिवादन.
Loading…