दिवाळीपूर्वी कर्जमाफी निश्चित मिळणार – सुभाष देशमुख

मुंबई – दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांना कर्जमाफी निश्चित मिळेल , अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली . कर्जमाफीसाठी सादर करण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांची पडताळणी करण्याची काम सुरु आहे . ज्या शेतकऱ्यांनी सादर केलेली माहिती बिनचूक आहे त्यांना कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ दिवाळीपूर्वी निश्चित मिळणार आहे .

फडणवीस सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचे जेवण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच केली होती . या कडे लक्ष वेधले असता श्री . देशमुख म्हणाले की , २००८ -०९ मध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत असताना जी कर्जमाफी दिली गेली तिचा लाभ मिळण्यास ९ महिन्यांचा कालावधी लागला होता . आमच्या सरकारने जूनमध्ये कर्जमाफी जाहीर केली . योजना जाहीर होऊन ५ महिनेच झाले आहेत.

२००८-०९ च्या कर्जमाफीच्या योजनेत आणि फडणवीस सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या योजनेत बराच फरक आहे असे सांगून श्री . देशमुख म्हणाले की , काँग्रेस आघाडीने बँकांनी दिलेल्या आकडेवारीनुसार तेवढी रक्कम बँकांमध्ये जमा केली . त्यामुळे त्यात अनेक गैरप्रकार झाले . अनेक बोगस कर्जदार तयार केले गेले . २००८-०९ च्या कर्जमाफीच्या योजनेत झालेले गैरप्रकार टाळण्यासाठीच आम्ही शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. खऱ्या गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा मिळाला पाहिजे या हेतूने संपूर्ण प्रक्रिया राबविली जात आहे . कोकणातील शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ करण्याची प्रक्रियाही लवकरच सुरु होईल , असेही त्यांनी नमूद केले