राज्य सरकार राबविणार मधुमकक्षिका मित्र उपक्रम – विशाल चोरडिया

पुणे : आज शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते पेस्टकंट्रोल करून पाडले जाते अथवा ते नष्ट केले जाते. मधुमक्षिकांबद्दल असलेली अपुरी माहिती आणि गैरसमाज यांतून हे प्रकार वाढले असून मधुमक्षिकांचे संरक्षण व संवर्धन व्हावे याबरोबरच मधुमक्षिका पालन या उद्योगासंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘मधुमक्षिका मित्र’ हा उपक्रम राबविला जाणार असल्याची घोषणा मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी आज केली. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व हातकागद संस्था, संशोधन, प्रशिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत नुकताच २० मे हा दिवस जागतिक मधुमक्षिका दिन म्हणून जाहीर करण्यात आला त्या निमित्ताने मंडळाच्या वतीने आज हातकागद संस्थेच्या आवारात असलेल्या महाखादी परिसरात पहिल्या जागतिक मधुमक्षिका दिनाचे औचित्य साधत तीन दिवसीय मधुमक्षिकापालन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, त्याचे उद्घाटन आज चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. सीबीआयआरटी अर्थात केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक दीप वर्मा, मध उद्योग तज्ज्ञ नाना क्षीरसागर, मध उद्योजक प्रशांत सावंत, सारिका सासवडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अनिल खेडकर, हातकागद संस्थेचे संचालक रमेश सुरुंग आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विशाल चोरडिया म्हणाले की, मधुमक्षिका हा मनुष्याला उपयुक्त असा कीटक आहे. मात्र त्याबद्दल अनेक गैरसमजही आहेत. परागीकरणाबरोबरच मधनिर्मिती, मेण निर्मिती यांसारख्या अनेक गोष्टींसाठी मनुष्याला त्याचा उपयोग होत असतो. मधुमक्षिकांकडून आपल्याला तब्बल १९ प्रकारचे मध मिळतात इतकेच नाही तर मधुमक्षिका पालनाशिवाय आपण त्याच्याशी संबंधित तब्बल ४६ प्रकारचे उद्योगही करू शकतो. मधुमक्षिकांची हीच उपयुक्तता आपण सामान्य नागरिकांना समजावून सांगणे आज महत्त्वाचे आहे. हे करीत असताना त्याबद्दल जागृती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि यातूनच राज्य सरकारच्या पुढाकाराने खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘मधुमक्षिका मित्र’ हा उपक्रम आम्ही हाती घेत आहोत. या अंतर्गत प्राणीमित्र, सर्पमित्र यांसारखेच मधुमक्षिकांच्या रक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यासाठी लवकरच कॉल सेंटरचे उभारणी करण्यात येईल. ज्याच्या मदतीने एखाद्या ठिकाणी मधमाशांचे पोळे आढळल्यास त्याला इजा न पोहोचविता मधमाशांचे शास्त्रीय पद्धतीने स्थलांतरण करीत त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे शक्य होणार आहे. याबरोबरच पुणे शहराला ‘हनी बी फ्रेण्डली सिटी’ करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत.

सदर उपक्रमाला पुण्यापासून सुरुवात होत असून नजीकच्या भविष्यात राज्याच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये देखील आम्ही हा उपक्रम पोहोचवीत मधुमक्षिका वाचाविण्याबरोबरच त्यांच्याशी संबंधित माहिती गोळा करण्याचा आमचां प्रयत्न असणार आहे, असेही चोरडिया यांनी यावेळी सांगितले.

याबरोबरच महाबळेश्वर येथे दोन एकर जागेत लवकरच देशातील पहिले ‘हनी बी पार्क’ सुरु करण्याची आमची योजना असून यामध्ये मधुमक्षिका पालन कसे करावे, कसे केले जाते, त्याच्या पद्धती, मध कसा काढावा, मधाचे पोळे कसे असते, मधुमक्षिकांचे काम कसे चालते यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मधुमक्षिकांबद्दलच्या जागृती बरोबरच या ठिकाणी एक टूरिस्ट हब कम माहिती केंद्र बनविण्याचा आमचा हा एक प्रयत्न असेल, असेही चोरडिया यांनी नमूद केले.

आजच्या पहिल्या मधुमक्षिका दिनानिमित्त तीन दिवसीय मधमाशापालन महोत्सवाला शिवाजीनगर येथील हातकागद संस्थेच्या आवारात असलेल्या महाखादी परिसरात सुरुवात झाली असून या अंतर्गत येत्या सोमवार दि. २१ मे, २०१८ पर्यंत मधुमक्षिकापालन साहित्य प्रदर्शन, शुद्ध मध कसा ओळखावा याबाबतचे प्रात्यक्षिक तसेच शेती व पर्यावरणा संदर्भात मधव्यवसायाचे महत्त्व, याविषयाशी संबधित माहितीपट अशा अनेक या विषयांवर चर्चासत्रे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य खुले असून याचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन हातकागद संस्थेचे संचालक रमेश सुरुंग यांनी केले आहे. एन. के. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर रमेश सुरुंग यांनी आभार मानले