रायगड जिल्ह्यातलं महाड शहर पाण्याखाली ; चार तालुक्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी

mahad

राज्याच्या अनेक भागात पाऊस आणि पुराचा जोर कायम असून रायगड जिल्ह्यातलं महाड शहर पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे. काल सायंकाळी महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल- एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आलं. या पथकानं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं असून भारतीय सैन्य दलाची तुकडी आणि तटरक्षक दलही महाडमध्ये पोहोचलं आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चार तालुक्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्यानं गावा गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेल्यानं अनेकांचा संपर्क तुटला आहे, तर महामार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. जिल्ह्यात एकाचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाण्यानं कराड तालुका तसंच पाटण तालुक्यातल्या बहुतांशी गावांना वेढा घातला असून पुरात अडकलेल्या नागरिकांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं २२ जवानांचं पथक कार्यरत आहे. पावसानं निर्माण झालेली परिस्थीती लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं कराड शहरात संचारबंदी लागू केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक गावांतला वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणारं पाणी यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थीती नियंत्रित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्याशी संवाद साधून अलमट्टी धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्याचं प्रमाण वाढवण्याबाबत काल चर्चा केली. त्यानुसार अलमट्टी धरणातून जास्तीचं पाणी सोडण्यात आलं आहे.

दरम्यान, पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी प्रशासन कार्यरत असून एनडीआरएफची २ पथके, सेनादलाचे ८० जणांचे पथक आणि नौदलाचे पथक विमानानं कोल्हापूरात येत असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची कार्यवाही या पथकांमार्फत करण्यात येईल.

उजनी धरणातून दिड लाख दसलक्ष घनफूट प्रतिसेकंद आणि वीर धरणातून एक लाख दसलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. यामुळं चंद्रभागा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून नदी काठावरची अनेक मंदीरं पाण्याखाली गेली आहेत.

दरम्यान, बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातल्या बहुतांश भागात आज आणि उद्या मध्यम ते जोरदार पावसासह तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून येत असलेल्या पाण्यामुळं जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असून धरणाची पाणी पातळी आज पहाटे ५२ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच एवढी विक्रमी आवक जायकवाडीत होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यामधल्या विविध गावातल्या नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याच्या मागणीसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. औरंगाबाद तालुक्यात विविध गावांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गावांचे सर्वेक्षण करून टँकर सुरू करण्याची मागणी औरंगाबाद तालुका काँग्रेस समितीनं केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

आदिवासी महामंडळाचा 1 कोटी 34 लाख रुपयांचा तांदूळ घोटाळा

नवनीत कौर राणा संसदेतून थेट शेतात ; सोयाबीनची केली पेरणी

सांगली शहराला महापुराचा मोठा फटका ; 31 हजार नागरिकांचे, तर 4 हजार जनावरांचे स्थलांतर