येत्या एक मार्च पासून शेतकरी पुन्हा संपावर

औरंगाबाद : हमीभाव व सरसकट कर्जमाफी  साठी शेतकरी पुन्हा संपावर जाणार सरकारला 1 मार्च पर्यंतचा वेळ  सुभेदारी विश्रामगृह येथे झालेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  त्यानंतर रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीमंत मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात कालिदास आपेट यांनी हा निर्णय जाहीर केला.

सुकाणू समितीचे शिष्टमंडळ येत्या 16 व 17 तारखेला शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी  चर्चा करणार आहे. त्यानंतर संपाच्या तयारीसाठी सुकाणू समितीचा महाराष्ट्रभर दौरा  होईल.त्यानंतर 1 मार्च रोजी शेतकरी संपावर जाईल असे  जाहीर करतानाच आज शेतकरी मेळाव्यात सुकाणू समितीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेचा आसूड ओढला यावेळी कालिदास आपेट यांनी प्रास्ताविकात पुढील आंदोलनाची व कृती कार्यक्रमाची दिशा स्पष्ट केली.  प्रतिभा शिंदे,गणेशकाका जगताप,  किशोर ढमाले,  करण गायकर  कॉ. नामदेव गावडे, यांनी  या मेळाव्यात सरकार च्या धोरणावर टीका करत भाषणे केली

सत्ताधारी नागनाथ आहेत तर विरोधी सापनाथ

प्रतिभा शिंदे यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी व विरोधी पक्ष आपसात मिळून शेतकऱ्यांना कसे  फसवतात सांगताना त्यांनी म्हटलं की, भाजप- सेनावाले नागनाथ, तर काँग्रेस- राष्ट्रवादीवाले सापनाथ आहेत. त्यामुळे आपल्याला आता महाराष्ट्रात या दोन्हींना एक समर्थ पर्याय आपल्याला उभा करणे गरजेचे आहे, हे दोघेही परवडणारे नाहीत. कारण सरकार पेरण्याची ताकद जशी शेतकर्‍यांमध्ये आहे तशीच कापण्याची ताकदही त्याच्यात आहे. सध्याच्या सरकारला शेतकरी- शेतमजुरांबद्दल जराही प्रेम नाही. त्यांच्याशी सरकारला आत्मीयता  नाही.  सदाभाऊ खोत यांच्यावरही प्रतिभा शिंदे यांनी टीकेची झोड उठवली. ‘नाव स्वाभिमानी आणि धंदा बेइमानी’ असे हे सदाभाऊ खोत. ते कधीच शेतकर्‍यांचे नव्हते.  अनिल पालोदे, संजय घाटनेकर, कॉ. भगवान भोजने, सचिन धांडे, बन्सी सातपुते आदींचीही मेळाव्यास उपस्थिती होती.

खर्‍या अर्थाने तुम्ही नीचच

नीच म्हटले असे मानून बाईसारखे रडत व त्याचे भांडवल करीत नरेंद्र मोदी यांनी गुजरातची सत्ता मिळवली; पण खरे सांगायचे तर हे भाजपवाले नीचच आहेत, असा हल्लाबोल छावा वीर क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केला. १ मार्चपासून सुरू होणार्‍या शेतकर्‍यांच्या संपात नाशिक जिल्हा ऐतिहासिक भूमिका पार पाडेल, अशी ग्वाही दिली. ‘कर्ज न घेणार्‍या एका आमदाराची कर्जमाफी झाली. हे स्वत: त्या आमदारानेच सांगितले. वारे डिजिटल इंडिया’अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.

मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना भावही कमी मिळतोय.यानंतर क्रांतिचौक येथील साखर सहसंचालकांच्या कार्यालयाकडे जाब विचारण्यासाठी रघुनाथदादा पाटीलांच्या नेतृत्वाखाली सुकाणू समितीचे सदस्य व उपस्थित शेतकरी रवाना झाले