शेतक-यांच्या देशव्यापी आंदोलनासाठी बलिप्रतिपदेचा मुहूर्त

अहमदनगर  : संपूर्ण राज्याला व विशेषत सरकारला हादरवून टाकणा-या शेतकरी संपाची ठिणगी नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथूनच पेटली होती. शेतकरी आंदोलनाची ही मशाल आता देशभर नेली जाणार असून देशभर शेतक-यांचा संघर्ष पेटविण्यासाठी दिवाळीतील बलिप्रतिपदा म्हणजे पाडव्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून 20 ऑक्टोबर  रोजी पुणतांबा येथे देशव्यापी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात देशभर करण्यात येणार्या शेतकरी लढ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती राज्य समन्वयक धनंजय जाधव यांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा पुणतांबा आता देशव्यापी शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनणार आहे ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.1 जून 2017 रोजी राज्यात शेतक-यांचे बेमुदत बंद आंदोलन पुकारण्यात आले होते.या आंदोलनाला राज्यातील शेतक-यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अखेरीस राज्य सरकारला शेतक-यांच्या पुढे झुकावे लागले. त्यानंतरच राज्यातील शेतक-यांना दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली. शेतकरी आंदोलनाची सुरूवात पुणतांबा येथूनच झाली होती.

शेतकर्यांना कर्जमाफी जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात अजूनही कर्जमाफीचा फायदा शेतक-यांना मिळालेला नाही. तसेच शेतकर्यांचे अनेक प्रश्न आज देखील प्रलंबित आहेत. त्यादृष्टीने आता देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता आहे. या देशव्यापी संपाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने पुणतांबा येथे देशभरातील शेतक-यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.या मेळाव्यात देशाच्या विविध राज्यांमधील शेतकरी सहभागी होणार असून मेळाव्यात देशव्यापी आंदोलनाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.