महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देणार : जिल्हा कृषी अधीक्षक

अहमदनगर/प्रशांत झावरे: महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांना आधुनिक काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व जागतिकीकरणात आपले स्थान उंचावण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण देणार असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याचे कृषी अधीक्षक पंडितराव लोणारे यांनी केले.

अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत शेतकरी कार्यशाळांना प्रारंभ झाला असून आज पारनेर तालुक्यातील वाळवणे गावात झालेल्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत आयोजित एकदिवसीय शेतकरी कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाळवणे गावचे सरपंच उत्तमराव पठारे हे होते. या कार्यक्रमाला जिल्हा कृषी अधीक्षक पंडितराव लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, गारगुंडीचे माजी सरपंच कृषिमित्र बाळकृष्ण झावरे यांसह तालुक्यातील सर्वच गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा.चेअरमन, विविध गावचे सर्व शासकीय पदाधिकारी, सर्वच क्षेत्रातील मान्यवर व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देणार : जिल्हा कृषी अधीक्षक IMG 20180524 WA0008 e1527151990598

जिल्हा कृषी अधीक्षक पंडितराव लोणारे पुढे म्हणाले की, कृषी विभागाने सर्वसामान्य शेतकरी डोळ्यापुढे ठेऊन अनेक कल्याणकारी योजना आखल्या असून त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा करोडो शेतकऱ्यांनी घेतला आहे, सर्वच शेतकऱ्यांनी अनेक प्रकारच्या कृषी विभागाच्या योजना आपापल्या गावांमध्ये राबविल्या असून यापुढेही कृषी विभाग यासाठी तत्पर असेल अशी ग्वाही लोणारे यांनी दिली. लोणारे यांनी कृषी विभागाच्या सर्वच योजनांचा आलेख सर्वांपुढे मांडला व त्या योजना राबविण्यासाठी करण्यात येणारी सर्व प्रक्रिया समजाऊन सांगितली. उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या या कार्यक्रमाचे कौतुक करून कृषी विभागाच्या सर्वच योजना राबविण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर व राहुरी कृषी विद्यापीठ कृषी तज्ञानी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमांतर्गत प्रमुख पिकांकरिता आधुनिक आणि अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करणे, विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देऊन कार्यपद्धती बाबत जनजागृती करणे, बिजप्रक्रिया प्रशिक्षण आयोजन, पीक विमा माहिती, पीक उत्पादनात स्थैर्य राखत उत्पादन खर्च कमी करणे. तसेच एम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांच्या नोंदी, गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा व प्रधानमंत्री अपघात विमा जनजागृती करणे,  विविध कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची दक्षता बाबत जनजागृती, जलयुक्त शिवार अभियान माध्यमातून तयार झालेल्या जलसाठ्यांमधील पाण्याच्या संरक्षित सिंचनासाठी वापराबाबत जनजागृती करणे यांसह अनेक उपयुक्त कार्यक्रम यामध्ये समाविष्ठ असल्याचे कृषी विभागाने सांगितले असून याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.