कर्जाचा बोजा उतरला; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू !

सातारा: सातारा जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या दोन भागात मोडणारा आहे, त्यातला एक हा सह्याद्रीच्या माथ्यावरचा आहे तर दुसरा भागा हा पर्जन्यमान छायेचा आहे. त्यामुळे या दोन्ही भागातले पिके वेगवेगळी आहेत. मागच्या दोन वर्षात पाऊस म्हणावा तसा पडला नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला होता. अनेकांची पीक कर्जाची थकबाकी राहिली होती. या वर्षी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या दिड लाखा पर्यंतचे कार्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. साताऱ्यातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना यात लाभ मिळाला आणि त्यांच्या डोक्यावरचा मोठा आर्थिक भार कमी झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

प्रत्यक्षात लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीया

विनोद प्रल्हाद देखणे, मु.पो. वाढे ता.जि. सातारा : माझ्या वडलांनी पिक कर्ज घेतले होते. वडलांच्या मृत्युनंतर मी घरातील थोरला असल्यामुळे हे कर्ज फेडण्याची जबाबदारी माझ्यावर आली. माझ्यावर 59 हजार 695 कर्ज होते. हे कर्ज शासनाने माफ केल्या मुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्जमाफीमुळे माझ्या मुलाचे शिक्षण व माझ्या भावाची जबाबदारी उचण्यास मदत होणार आहे. कर्जमाफी केल्याबद्दल शासनाचे मी आभार मानतो.

विठ्ठल बाजीराव चव्हाण, मु. सांगवी पो. भोसे, ता. कोरेगाव : मी अडीच एकरावर विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज काढले होते. ऊसाबरोबर आल्याचे पिक घेतले होते. पाणी कमी पडल्यामुळे आल्याचे पिक खराब झाले. त्यामुळे घेतलेले कर्ज मी फेडू शकलो नाही. शासनाने माझे 1 लाख 2 हजार 656 रुपयांचे कर्ज माफ केले. यामुळे मी आर्थिक दृष्ट्या सक्षम झालो. यापुढे चांगल्या पद्धतीने शेती करणे. शासनाने कर्जमाफी केल्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो.

बाजीराव दत्तू नांदे मु. सांगवी पो. भोसे, ता. कोरेगाव : माझे वय 95 वर्ष आहे. माझ्या शेतातील विहिरीला पाणी कमी असल्यामुळे माझे पीक वाया गेले. त्यामुळे मला कर्जाची परतफेड करता आली नाही. शासनाने कर्जमाफी केली व माझ्यावरचा मोठा भार कमी केला. मी शासनाचे आभार मानतो.

तानाजी सोपान मोरे, मु.पो. सासुर्वे, ता. कोरेगाव : मी 40 गुंठे क्षेत्रासाठी 34 हजार रुपये कर्ज घेतले होते. पाणी नसल्यामुळे माझे ऊसाचे पीक वाळून गेले व माझ्यासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली. शासनाने कर्जमाफी केल्यामुळे मी आता आनंदी व समाधानी आहे.

संभाजी तुकाराम मोरे, मु.पो. सासुर्वे, ता. कोरेगाव: सासुर्वे विविध कार्यकारी सोसायटीकडून 30 गुंठ्यासाठी 25 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. पाऊस कमी व मुलीच्या लग्नामुळे माझी परिस्थिती नाजूक झाली होती यामुळे मी कर्ज फेडू शकलो नाही. शासनाने माझी कर्जमाफी करुन मला दिलासा दिला आहे.

विश्वास विठोबा साळुंखे, मु.पो. शिरढोण ता. कोरेगाव : मी 12 गुंठ्यासाठी 8 हजार कर्ज घेतले होते. माझ्या शेतातील पीक पावसाअभावी वाया गेले. यामुळे मला कर्जाची रक्कम फेडता आली नाही. शासनाने कर्ज माफी केली यापुढे चांगली शेतीकरुन घेतलेले कर्ज नियमित फेडेन.

जगन्नाथ शंकर जाधव, मु.पो. शिरढोण ता. कोरेगाव: माझ्या वडलांनी सोसायटीमधून कर्ज घेतले होते. आमचे एकूण अडीच एकर क्षेत्र आहे. पाण्याअभावी आमच्या शेतातील पिक वाया गेले त्यामुळे कर्ज फेडता आले नाही. शासनाने कर्ज माफी केली. यापुढे चांगली शेतीकरुन आमचा विकास करु.

गुलाब आनंदराव सावंत, मु.पो. ल्हासुर्णे ता. कोरेगाव : पाऊस न झाल्यामुळे व मुलीच्या लग्नामुळे सोसायटीकडून घेतलेले 2015 मध्ये घेतलेले कर्ज मला फेडता आले नाही. शासनाने माझी कर्जमाफी केली. यामुळे आता माझ्या मुलाच्या शिक्षणाला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. मी शासनाचा आभारी आहे.

उद्धवराव पांडूरंग माने, (पत्नी गीताबाई माने) मु.पो. ल्हासुर्णे ता. कोरेगाव : माझ्या पतीने विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज काढले होते. माझे पती सतत आजारी असतात. यामुळे कर्ज फेडता आले नाही. शासनाने आमचे 1 लाख 3 हजार 286 रुपयांची कर्ज माफी दिली आहे. चांगली शेती करण्याबरोबर माझ्या पतीवर औषधोपचार चांगल्या पद्धतीने करता येईल. शासनाचे मी आभारी आहे.

या कर्जमाफीमुळे शेतकरी आता मोठ्या जोमाने कामाला लागतील, कोणाची मुल शिक्षण घेत आहेत, त्याला मोठा हातभार लावता येईल, अशी भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत.