महाराष्‍ट्र हे रेशीम व्‍यवसायात देशात एक क्रमांकाचे राज्य व्हावे – सुभाष देशमुख

पुणे  शेती व्‍यवसाय फायदेशीर व्‍हावा, यासाठी शासन प्रयत्‍नशीलअसून शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी रेशीम शेती  प्रभावी  उपाय ठरेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन महाराष्‍ट्र हे रेशीम व्‍यवसायात देशात एक क्रमांकावर आणण्यासाठी  प्रयत्न करावा, असे आवाहन पणन व वस्‍त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

            महारेशीम अभियान 2018 च्‍या राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार वितरण समारंभात ते बोलत होते. यशवंतराव चव्‍हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) मध्‍ये आयोजित कार्यक्रमास  वस्‍त्रोद्योगचे अपर मुख्‍य सचिव उज्‍ज्‍वल उके, रेशीम संचालनालयाचे संचालक संजय मीणा, बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी)  महासंचालक कैलास कणसे आदी उपस्थित होते.

            सहकार व वस्‍त्रोद्योग मंत्री श्री. देशमुख म्‍हणाले,  मराठवाडा आणि विदर्भ हे विभाग आर्थिकदृष्‍टया मागासलेले आहेत. या भागातील बागायती क्षेत्र कमी आहे, शेतीचे उत्‍पादन कमी आहे,  मालाला भाव, कर्जपुरवठा  अशा अडचणींवर मात करत शेती केली जाते. रेशीम व्‍यवसाय हा फायदेशीर ठरणारा असून शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍येवर तो प्रभावी उपाय ठरेल.  मराठवाडा आणि विदर्भ हे केंद्रबिंदू मानून या भागात रेशीम उद्योग वाढीसाठी प्रयत्‍न व्‍हावेत. बार्टीच्‍या समतादूतांच्‍या मदतीने रेशीम व्‍यवसायाची माहिती शेवटच्‍या शेतक-यापर्यंत  पोहोचवण्‍यास मदत झाल्‍याचा गौरवपूर्ण उल्‍लेख करुन श्री. देशमुख यांनी रेशीम व्‍यवसायात महाराष्‍ट्र हे देशातील एक क्रमांकाचे राज्‍य बनवण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन केले. गतवर्षीचे उद्दिष्‍ट पूर्ण झाल्‍याबद्दल अभिनंदन करुन यंदा 30 हजार एकर रेशीमलागवडीचे उद्दिष्‍ट डोळ्यासमोर ठेवून ते साध्‍य करण्‍याचेही त्‍यांनी आवाहन केले.

            बार्टीचे  महासंचालक कैलास कणसे यांनी बार्टीच्‍या समतादूतांच्‍या माध्‍यमातून रेशीम संचालनालयाशी जोडले गेल्‍याचे नमूद करुन शेतक-यांच्‍या जीवनात सकारात्‍मक बदल घडवण्‍यात यश मिळत असल्याचे सांगितले.  देशात रेशीम उद्योगात महाराष्‍ट्र एक क्रमांकावर आणण्‍यासाठी सहकार्य करु, असेही ते म्‍हणाले.

            वस्‍त्रोद्योगचे अपर मुख्‍य सचिव उज्‍ज्‍वल उके यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि समतादूतांच्‍या एकत्रित समन्‍वयाने रेशीम लागवडीचे उद्दिष्‍ट साध्‍य झाल्‍याचे सांगितले. भविष्‍यातही याच उत्‍साहाने उद्दिष्‍टपूर्ती होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

            सहकार मंत्री देशमुख यांच्‍या हस्‍ते राज्‍यातील सर्वोत्‍तम प्रादेशिक  विभागाचा पुरस्‍कार औरंगाबादचे सहायक संचालक दिलीप हाके यांनी तर राज्‍यस्‍तरीय सर्वोत्‍कृष्‍ट जिल्‍हा पुरस्‍कार औरंगाबादचे रेशीम विकास अधिकारी बी. के. सातदिवे यांनी स्‍वीकारला. याशिवाय पुणे प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे,  बार्टीच्‍या प्रकल्‍प संचालक प्रज्ञा वाघमारे, औरंगाबादचे क्षेत्र सहायक एम.पी.साळुंखे,समतादूत श्‍याम गंगाधर, हिंगोलीचे  रेशीम विकास अधिकारी  जी. एस. ढावरे,अमरावतीचे सहायकसंचालक एम.बी. ढवळे यांचाही पुरस्‍कार देऊन  गौरव करण्‍यात आला.

            रेशीम संचालनालयाचे संचालक संजय मीणा यांनी  आभार प्रदर्शन केले. ते म्‍हणाले, समतादूतांनी रेशीम शेतीविषयी शेतक-यांमध्‍ये जागृती निर्माण केली. रेशीम संचालनालयाच्‍या अधिकारी-कर्मचारी रेशीम शेतीचे उद्दिष्‍टपूर्ण करुन उच्‍चांक साधतील, अशी खात्री व्‍यक्‍त केली.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्‍हा रेशीम अधिकारी गणेश राठोड आणि अजय मोहिते यांनी केले.