Maharashtra Weather Update | राज्यात पुन्हा वातावरण बदलणार, पावसानंतर येणार थंडीची लाट

Maharashtra Weather Update | राज्यात पुन्हा वातावरण बदलणार, पावसानंतर येणार थंडीची लाट

Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात (Maharashtra) पावसाचे (Rain) वातावरण (Weather) निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे. राज्यात कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलच झोडपलं आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे पिकांना मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत पुढचे तीन दिवस हिमाचल प्रदेश पंजाब आणि राजस्थान मधील काही ठिकाणी वातावरणात बदल झाला आहे. परिणामी राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

राज्यामध्ये सध्या सातत्याने वातावरणात बदल होत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, तर अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, राज्यासह गुजरातमध्ये पुढील दोन ते तीन दिवसानंतर म्हणजेच साधारण सोमवार 19 डिसेंबरपासून किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून, वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. दरम्यान, सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. राज्यामध्ये वाशिम, नंदुरबार, बुलढाणा, हिंगोली, रायगड, पालघर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता.

वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून ढगाळ वातावरण होते. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुलढाणा शहर आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्याचे रब्बी पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दोन दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे आधी शेतकरी चिंतेत आल्यानंतर त्यात अजून अवकाळी पाऊस आणि भर घातली आहे.

महत्वाच्या बातम्या