fbpx

अन्नत्याग करणाऱ्या कृषीकन्यांची विखे पाटलांवर टीका

अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या मुलींना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुणतांबा गावात परतलेल्या तिघींचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत करत जोरदार घोषणाबाजी केली. आपला एक लढा संपला असला तरी आता दुसरा लढा सुरू झाला, असा इशारा यावेळी निकीता जाधव हिने दिला आहे.

उपोषण सोडून पुणतांब्यात परतलेल्या निकीता जाधव आणि इतर मुलींचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना यायला वेळ मिळाला. मात्र, मतदार संघातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना यायला वेळ मिळाला नाही. हे विरोधी पक्षनेते आहेत की सरकारचे नातेवाईक आहेत, अशी टीकाही तीने केली.

सरकार आमच्या आंदोलनाची दखल घेत नाही, असा आरोपही या मुलींनी केला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या , पिकाला हमीभाव द्या, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, शिवसेनेचं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह या मुली शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. याच आश्वासनानंतर मुलींनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

मुलींची तब्येत बिघडल्याने पोलिसांनी बळजबरीने मुलींच्या या आंदोलनावर कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईला आंदोलक मुलींनी आणि ग्रामस्थांनी विरोध केला. मुलींचा विरोध असतानाही महिला पोलिसांनी उचलून रुग्णवाहिकेत टाकले. उपोषणस्थळाचा मंडपदेखील उखडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे उपोषणाचा लवलेशही दिसत नाही. निकिता जाधव हिचे वडील धनंजय जाधव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करता येत नसतील तर सरकारने आमची शेती करावी. त्याबदल्यात आम्हाला चतुर्थ श्रेणी कामगारांचा पगार द्यावा, अशी मागणी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या तरुणींनी केली आहे.

पुणतांब्यातील कृषीकन्येच्या वडिलांना न्यायालयीन कोठडी; आंदोलनही तूर्तास मागे

गेल्या ६ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. मात्र, आज पोलिसांनी बळाचा वापर करत तिन्ही मुलींना रुग्णालयात दाखल केलं. तसंच या मुलींचे वडील आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या चौघांनाही १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे तुर्तास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आश्वासनानंतर या मुलींनी आंदोलन मागे घेतले आहे.

मुलींना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली तेव्हा मुलींच्या वडिलांसह कार्यकर्त्यांनी विरोध केला. पोलिसांनी या प्रकरणी धनंजय जाधव, प्रताप वहाडणे, हेमंत कुलकर्णी आणि गजेंद्र जाधव यांना ताब्यात घेतले होते. त्यांना कोर्टाने १८ फेब्रुवारीपर्यंत या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने या मुलींनी गेल्या ६ दिवसांपासून अन्नदान आंदोलन केले होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या , पिकाला हमीभाव द्या अशा त्यांच्या मागण्या होत्या. पण अखेर आज पोलिसांनी बाळाचा वापर करून या मुलींचे आंदोलन मोडून काढले. तसेच एवढे होऊनसुद्धा सरकारने अद्यापही या गोष्टीची दाखल घेतलेली नाही.

Add Comment

Click here to post a comment