मराठा समाज आक्रमक; मुंबई, पुण्याला होणारा दूध पुरवठा उद्या रोखणार

कोल्हापुर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाची आठवण पुन्हा आता मराठा समाजाकडून केली जात आहे. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आणि आता जनतेमध्ये पुन्हा असंतोष वाढायला लागला आहे. सध्याचं महाविकासआघाडी सरकार आरक्षणाचा पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात कमी पडलंय का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

मराठा समाज आता राज्यात आक्रमक होत असून अनेक ठिकाणी निदर्शने व आंदोलने केली जात आहे, तर कोल्हापुरात गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सर्व मराठा संघटना यात सामील होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी देखील सरकारला चांगलेच लक्ष्य केले असून सर्वपक्षीय आमदार, खासदार मराठा आरक्षणाप्रकरणी एकवटत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक झालेला दिसून येत आहे. मराठा आरक्षणप्रकरणी स्थगिती उठवून मराठा समाजाला कायमचे आरक्षण मिळावे यासाठी उद्या पुणे, मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद पाडणार असल्याचा इशारा मराठा समाज आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा दूध पुरवठा उद्या खंडित होणार आहे.

गोकुळ, वारणा, चितळे यासह मोठ्या प्रमाणात होणारा दुधाचा पुरवठा होऊ देणार नसून दूध टँकर अडवले जातील अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आता पर्यंत अनेक मराठा मोर्चे शांततेत पार पडले, सामान्य नागरिकांना कोणताही त्रास झाला नाही. मात्र आता आक्रमक होण्याची गरज असून सरकारने लवकरात लवकर योग्य पाऊल उचलावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. उद्या पुण्यासह मुंबईत दुधाचा तुटवडा जाणवु शकतो.

महत्वाच्या बातम्या –