वीजयंत्रणे जवळील कचरा पेटल्याने महावितरणचे लाखोंचे नुकसान

पुणे : वारंवार आवाहन करूनही वीजयंत्रणेजवळ कचरा टाकण्याचे व हा कचरा जाळण्याचे, पेटण्याचे प्रकार सुरु आहे. यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून वीजग्राहकांना सुद्धा खंडित वीजपुरवठ्याला नाहक सामोरे जावे लागत आहे.

शहरी भागात सध्या अनेक भागात वीजयंत्रणेजवळ कचरा टाकण्याचे व तो जाळण्याचे, पेटण्याचे प्रकार दिसून येत आहेत. यामध्ये रविवारी (30 डिसेंबर) दुपारी एक वाजताच्या सुमारास बाणेर रोडवरील रामनदी पुलाच्या बाजूने लोखंडी ट्रेन्चमध्ये असलेल्या केबलवर टाकलेला कचरा पेटला. पुलावर लोखंडी जाळी लावली असली तरी त्यावरून नदीत कचरा टाकण्याच्या प्रयत्नात हा कचरा केबलवर पडत होता व साठलेल्या कचऱ्याला आग लागली. यात महावितरणच्या उच्चदाबाच्या तब्बल 6 वीजवाहिन्या जळाल्याने बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस रोड परिसरातील सुमारे 35 हजार ग्राहकांचा सुमारे अडीच ते तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला व महावितरणला वीजविक्रीमध्ये नुकसान तसेच जळालेल्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचा सुमारे साडे तीन लाख रुपयांचा खर्च सहन करावा लागला.

 

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत घरातील कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वीजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडत आहेत. ओव्हरहेड वीजतारांखाली असलेल्या कचऱ्याच्या ढिगारा पेटविल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका आहे. अशा घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत.

महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कपाऊंड लावलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आतमध्ये कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्यपदार्थामुळे छोटे प्राणी तेथे येतात व वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर वीजपुरवठा खंडित होतो किंवा प्राण्याचा नाहक जीवही जातो. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे तसेच वीजयंत्रणेच्या परिसरात किंवा कपाऊंडमध्ये ओला व सुका कचरा टाकण्याचे टाळावे. नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीजयंत्रणेला आग लागल्याचे किंवा संभाव्य धोका असल्याचे दिसताच टोल फ्री असलेल्या 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.