कोरोनाच्या निर्बंधामुळे दुधाचे दर चार रुपयांनी घसरले; पशुपालक आर्थिक अडचणीत

दुध

जालना: सततच्या लॉकडाऊनमुळे घसरलेल्या दुधाच्या दरात तीन महिन्यांपूर्वी वाढ झाली होती. परंतू कोरोनाच्या निर्बंधामुळे प्रतिलिटर ४ रुपये दर घसरले आहेत. दुधाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे पशुपालकांची आर्थिक अडचण होत आहे. शेतीसाठी जोडधंदा म्हणून दूग्ध व्यवसाय केला जातो. यासाठी हिरवी वैरण व खुराकाची आवश्यकता आहे. मक्याचे पीठ व पेंडीचे दर गगनाला भिडले आहेत.

त्यामुळे दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. यातच वरचेवर होणाऱ्या दूध दरवाढीतील घसरणीमुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. मागील महिन्यात सरकारी दूध डेअरीत गाईच्या दुधाला २८ तर म्हशीच्या दुधाला ४० रुपयांचे दर दिला जात होता. कोरोनाची दुसरी लाट आली अन महाराष्ट्र शासनाने कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महानगरातील दूध व दुग्धजन्य पदार्थाची मागणी घटली आहे. याचा परिणाम म्हणून आज रोजी गाईचे दूध २४ रुपये तर म्हशीचे दूध ३८ रुपये लिटरने खरेदी केले जात आहे.

दूध संकलन केंद्रात दुधाच्या सर्व चाचण्या पूर्ण केल्या जातात त्यात पिष्टमय पदार्थ परिक्षण, मीठ परिक्षण, विशिष्ट गुरुत्व परिक्षण, आम्लता परिक्षण, साखर परिक्षण, घृतांक परिक्षण, युरिया परिक्षण या सर्व चाचण्या पूर्ण करून दूध खरेदी केली जात आहे. मागील कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर घसरलेले दुधाचे दर मागील तीन महिन्यांपासून बरे मिळत होते. परंतू कोरोनाच्या निर्बंधांमुळे झालेल्या दरातील घसरणीमुळे पशुपालकांची आर्थिक अडचण होत आहे.

महत्वाच्या बातम्या –