कोकण कृषी विद्यापीठाला जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखले तातडीने द्या – कृषिमंत्री चंद्रकांत पाटील

दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला देण्याची कार्यवाही गती वाढवावी. तसेच त्यांना नोकरी देण्यासंदर्भातही प्रस्ताव पाठवावे, असे निर्देश कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील विविध समस्यासंदर्भात आमदार निरंजन डावखरे यांच्या विनंतीनुसार आज मंत्रालयात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. यावेळी राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, आमदार निरंजन डावखरे, प्रकल्पग्रस्त संघटनेचे नेते माजी आमदार विजय गव्हाणे, कृषी विभागाचे सहसचिव श्री. गावडे आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत राज्य शासनाने पूर्वीच सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या प्रक्रियेला गती द्यावी. तसेच प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठात नोकरीसाठी इतर विद्यापीठातील प्रक्रियेप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव द्यावेत. तसेच विद्यापीठातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्याचा प्रस्तावही विद्यापीठाने राज्य शासनाकडे द्यावा.

गरजू शेतकऱ्यांचा आधार : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना