लासलगावला कांदा हब बनविणार मंत्री सदाभाऊ खोत यांची घोषणा

लासलगाव : कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत निर्बंध घालु देणार नाही असे आश्वासन देत लासलगाव येथे कांदा हब निर्माण केले जाईल अशी महत्वाची घोषणा राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने विंचूर येथे कांदा लिलावाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

यावेळी राज्याचे कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,आमदार अनिल कदम तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्यासह बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. ते म्हणाले की, व्यापारी वर्गाकडून कांद्याची साठवणूक केली जात आहे या कांद्याच्या अमर्यादित साठवणुकीवर निर्बध घालण्यात येणार असून कांद्याची आयात देखील कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाबरोबरच सर्व सामान्य लोकांना देखील कांदा खरेदी विक्री करणे परवडणार आहे. तसेच शेतकऱ्याचा शेतमालाला अधिक भाव देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कांदा साठवणूक चाळीच्या निधीत भरघोस वाढ केली असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, पस्तीस लाख मेट्रिक टनाची होणारी आयात कमी करून ती दोन लाख टनावर आणली आहे. त्याचा फायदा सोयाबीन दरात वाढ झाली आहे. मी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळेच सत्तेत शेतक-याचा समस्येवर आपण जागरूकतेने काम करत असल्याचे सांगून लासलगांव येथे कांदा हब घोषित करीत असुन त्याकरता या सप्ताहात एक बैठक घेण्यात येईल.

तसेच कांद्यासाठी मोठ्या प्रमाणावर गोदाम तसेच रेल्वे सुविधांवर भर दिला जाईल. असे ते म्हणाले. कांद्याच्या प्रश्नांवर बोलतांना ते म्हणाले की, कांदा प्रश्नावर काहीही झाले तर कांदा उत्पादकांसाठी मी स्वता येउन नाशिक जिल्ह्य़ात आंदोलन करील हा शब्द देतो असे सांगून सर्व शेतक-याचे माझ्यावर लक्ष आहे त्याला मी कदापी तडा जाऊ देणार नाही असे सदाभाऊ खोत यांनी आश्वासित केले. तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही अशियाखंडाची समिती आहे तिला वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.