शेतक-यांनासुध्दा तुम्ही सोडत नाही. कुठे फेडाल हे पाप? -अनिल गोटे

धुळे – भूमाफिया आणि दलालांनी सुलवाडे-कान्होली-जामफळ प्रकल्पाचे बारा वाजविले. दलालांच्या, भूमाफियांच्या दबावाखाली या प्रकल्पाचे काम रोखले गेल्याचा गंभीर आरो शहराचे आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. डाकीण सुध्दा एक घर सोडते. तुम्हाला सत्ता देणा-या शेतक-यांनासुध्दा तुम्ही सोडत नाही. कुठे फेडाल हे पाप? आरोप करत आमदार गोटेंनी सत्ताधा-यांनाच पत्रकातून सुनावले आहे.

आ.गोटेंनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सुलवाड-जामफळ- कान्होली प्रकल्पाला तात्कालीन जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी 22 मार्च 2016 ला मंजूरी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री फडवणीस यांनी या प्रकल्पाला एस.एस.एफ.सी दिले. 798 कोटी रुपयांच्या मुळ प्रकल्पाला 23 कोटी रुपयांची हमी राज्य शासन दिल्यांनतर या प्रकल्पाचे काम सुरु होणे आवश्यक होते. प्रकल्पासाठी 25 टक्के सहभाग राज्य शासनाचा व 75 टक्के सहभाग हा केंद्र शासनाचा अशा अटींवर 23 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. मात्र मी केले, मी केलेच्या वादात प्रकल्प मागे पडला. आता प्रकल्पाच्या अटीशर्तीमध्ये बदल झाले आहेत. 75 टक्के रक्कम म्हणजेच 1100 कोटी राज्य शासनाला गुंतवणूक करावी लागणार आहे. तर केंद्र शासन फक्त 600 कोटी रुपये देणार आहे. या विलंबामुळे जिल्हयातील राजकीय वरदहस्त असलेल्या भूमाफिया आणि दलालांनी फार मोठ्या प्रमाणात जामफळ तलाव क्षेत्रात जमिनी खरेदी केल्या आहेत.

गेल्या दीड वर्षात धुळे तालुक्यातील सोनगीर व शिंदखेडा तालुक्यातील सोंडले या गावांच्या शिवारात किमान दीडशे एकर जमिनीचा फेरफार झाला आहे.ज्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही, अशा ठिकाणी डाळींब. आंबे अशी बारमाही बागायती फळलावण्यात आले आहेत. त्यामुळे भूसंपादनात भरपाईची किंमत किमान 10 ते 15 पटीने अदा करावी लागणार आहे. ही रक्कम शेतक-यांच्या घरात नव्हे तर दलाल, भूमाफिया आणि त्यांना संरक्षण देणा-या राजकीय नेत्यांच्या घशात जाणार आहे. धुळे आणि शिंदखेडा तालुकयातील 100 गावांच्या शेतक-यांच्या शेतात बारामाही पाणी येवून त्यांचे नशीब बदलविणा-या प्रकल्पाचे खरे तर युध्द पातळीवर काम हाती घेण आवश्यक होते. मात्र तीन महिन्यात होईल? तीन महिन्यात होईल? असे गोड गाजर दाखविण्याचे काम दुर्देवाने घडले आहे. झालेल्या विलंबामुळे प्रकल्पाची मुळ किंमत कोटयावधी रुपयाने जास्त होणार आहे. भूमाफिया आणि दलालांचे आर्थिक हितसंबंध सांभाळण्याकरिताच या प्रकल्पाचे काम लांबविेले जात आहे. तीन महिने करता करता अठरा महिने निघून गेले. पिढ्यानपिढ्या दुष्काळाचा सामना करणा-या शेतक-यांनाही यांनी सोडले नाही. तेव्हा कुठे फेडणार हे पाप असा सवालही आमदार अनिल गोटे यांनी पत्रकातून सत्ताधा-यांना केला आहे.