मोदी आणि फडणवीस सरकार आणखी किती शेतकर्‍यांचे बळी घेणार?

मुंबई – फसवी कर्जमाफी व शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे विदर्भातील आणखी एका शेतकर्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मागील काही दिवसातील ही चौथी घटना असून त्यातील 3 शेतकर्यांचा बळी गेला तर 1शेतकरी मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे मोदी व फडणवीस सरकार आणखी किती शेतकर्यांचा बळी घेणार आहे?असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शामराव रामा भोपळे या 68 वर्षीय शेतकर्याने 6 मे रोजी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात हा शेतकरी 90 टक्के भाजला असून नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. या पार्श्वभूमीवर खा.अशोक चव्हाण यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार यांच्यावर प्रहार केला आहे.

खा.चव्हाण पुढे म्हणाले की, उपरोक्त शेतकर्यांनी बँक आणि सेवा सहकारी सोसायटीकडून 17 हजार 360 रुपयांचे कर्ज घेतले. त्यांनी शासनाकडे कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज केला परंतु या कर्जमाफीस ते अपात्र ठरले. त्यासोबतच अल्प भूधारक असलेल्या या शेतकर्याने आपल्या शेतीत उत्पादीत केलेल्या सोयाबीन, तूर, व हरभरा या तिन्ही शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी आपल्या आत्महत्येस नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत असे म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला.

अशाच पध्दतीची घटना 10 एप्रिल रोजी यवतमाळ जिल्हयातील घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे घडली. शंकर चायरे या 55 वर्षीय शेतक-याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. तर 14 एप्रिल रोजी यवतमाळ जिल्ह्यातीलच सावळेश्वर येथील माधव शंकर रावते यांनी स्वतःच्या शेतात तुरीच्या काडयाची चिता रचून स्वतःला पेटवून घेतले. यापूर्वी याच जिल्ह्यातील प्रकाश मानगावकर या शेतकर्याने सागाच्या पानावर माझ्या मृत्यूला मोदी सरकार जबाबदार आहे, असे लिहून गळफास लावून घेतला व आपली जीवनयात्रा संपवली.

एका मागून एक शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार मात्र झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. शेतकर्यांच्या मालाला हमी भाव दिला जात नाही. त्यासोबतच कर्जमाफीच्या केवळ घोषणा असून याचा प्रत्यक्ष फायदा शेतकर्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळेच निराश झालेल्या शेतकर्यांनी आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारला आहे. हे शासन शेतकर्यास आत्महत्या करण्यासाठी भाग पाडत असून आणखी किती शेतकर्यांना आत्महत्या करण्यास हे शासन प्रवृत्त करणार आहे? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.