‘या’ जिल्ह्यात सलग सातव्या दिवशी कोरोनामुक्तांचा आकडा अधिक

कोरोना

पुणे – गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात येत होती. दरम्यान, शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम आता दिसू लागला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात नव्याने ४ हजार ६३१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हा आकडा कालच्या कोरोना रुग्ण बाधितांपेक्षा अधिक असला तरी कोरोना मुक्तांची संख्या अधिक असल्याने दिलासा कायम आहे.

आज सलग सातव्या दिवशी कोरोना मुक्तांची संख्या ही बाधितांपेक्षा अधिक आहे. आज ४ हजार ७५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशातच, राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे शहरातील बाधितांची संख्या कमी होण्यास अधिक वेग येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशीच रुग्णसंख्या घटत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे ‘आता नको कोणतीही ढिलाई, बाकी आहे मोठी लढाई !’ असं आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं असून पुढील आठवडा शहरासाठी महत्वाचा असून सर्वांचं सहकार्य अपेक्षित असल्याचे देखील मोहोळ म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –