वीज पडल्याने माय-लेकराचा करुण अंत

जळगाव :  जळगाव ता. कोरेगाव येथील अडाळकी नावाच्या शिवारात घेवडा पीक काढायला गेलेल्या शंकुतला भिकू कुंभार (वय 37) व किशोर भिकु कुंभार (वय 20) या माय-लेकरावर शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी दुपारी कुंभार कुटुंबातील चौघेजण रानातील घेवडा काढण्यासाठी गेले होते. बहुतांशी पीक काढल्यानंतर सायंकाळी घरी परतण्याची लगबग सुरू होती. याचवेळी पावसाने हजेरी लावल्याने ते रानातच अडकले. यावेळी विजांचा कडकडाट होत असतानाच या माय-लेकरावर वीज कोसळली. त्यामध्ये दोघांचा दुदैवी अंत झाला. डोळ्यादेखत पत्नी व मुलगा होरपळल्याने भिकू कुंभार हे भयकंपित झाले. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.