माझे कुटुंब माझी जबाबदारी : 18 लाख 54 हजार नागरिकांना गृहभेटीद्वारे आरोग्य शिक्षण

नागपूर – कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सुमारे 18 लाख 54 हजार 102 नागरिकांना गृहभेटीद्वारे तपासणी करुन उपचार व आरोग्य शिक्षण या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.

ग्रामीण भागामध्ये कोविड-19 रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. अनलॉक मार्गदर्शक सूचनानुसार हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून सामान्य जनतेमध्ये या आजाराची भिती कमी होत आहे. त्यामुळे ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ या अंतर्गत प्रत्येक नागरिकांची तपासणी, आरोग्य शिक्षण तसेच संशयित कोविड रुग्ण शोधण्यासाठी 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत विशेष आरोग्य तपासणी मोहिम जिल्हयात राबविण्यात येत आहेत. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी विशेष सर्वेक्षण पथक तयार करण्यात आले आहे. गृहभेटीमध्ये आरोग्य कर्मचारी व दोन स्वयंसेवक राहणार असून प्रत्येक दिवशी 50 घरांना भेटी देणार आहे. इन्फ्रारेड थर्मामिटर, पल्स ऑक्सीमीटरद्वारे प्रत्येकाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

गृहभेटीमध्ये आरोग्य शिक्षण यासोबतच मधुमेह, ह्दयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा आदी आजाराच्या व्यक्ती शोधून काढणे तसेच अतिजोखिमेचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण हो गृहभेटीचा मुख्य कार्यक्रम राहणार आहे. कामठी व कळमेश्वर तालुक्यात प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. जिल्हयात सरासरी 7 हजार 714 सर्वेक्षणाचे दिवस असून 1 हजार 846 सर्वेक्षण पथके 4 लाख 20 हजार 997 घरांना दोनवेळा भेट देणार आहेत.

गृहभेटीच्या उपक्रमांतर्गत कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी आरोग्य शिक्षणाअंतर्गत सतत मास्क घालून राहणे, दर दोन ते तीन तासाने साबणाने स्वच्छ हात धुवावे, कोविड रुग्णांनी होम ऑयसोलेशन अंतर्गत घरी राहावे किंवा रुग्णालयातून 10 दिवसानंतर 7 दिवसाचे होम ऑयसोलेशन, स्वतंत्र टॉयलेट, बॉथरुम, जेवणाची भांडी स्वतंत्र वापरावी. ताप आल्यास, थकवा जाणवू लागल्यास त्वरीत रुग्णालयात जावे आदी शिक्षण जनतेला देण्यात येणार आहे.

माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभोजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.एस. सेलोकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री.इलमे तसेच उपविभागीय महसूल अधिकारी, गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सर्वेक्षणासाठी 1 हजार 846 पथक सज्ज

माझे कुटूंब-माझी जबाबदारी या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी तसेच गृहभेटीसाठी जिल्हयात 1 हजार 846 पथके तयार करण्यात आली आहे. यामध्ये नरखेड तालुक्यात 129, भिवापूर 84, कामठी 131, काटोल 162, मौदा 158, कुही 89, पारशिवनी 155, रामटेक 164, हिंगणा 130, सावनेर 212, कळमेश्वर 58, नागपूर 275 व उमरेड तालुक्यासाठी 99 पथके आहेत. या पथकांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यासह तीन कर्मचारी राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या –