नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील समस्या सोडविणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

नंदुरबार जिल्ह्यातील बहुतेक भाग डोंगराळ आणि दुर्गम असून या भागातील समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  यावेळी पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी, कृषी सचिव एकनाथ डवले, जलसंपदा सचिव आय.एस. चहल, ऊर्जा सचिव असिमकुमार गुप्ता, आमदार राजेश पाडवी, शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, जिल्ह्याचा परिसर सुंदर असून दुर्गम भागामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नंदुरबार भेटीत निदर्शनास आले आहे.  डोंगराळ भागाच्या विकासाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात येईल. येथे आरोग्य सेवा पुरविणे मोठे आव्हान आहे.  त्यामुळे त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य शासन करेल.  शहादा ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल.  उकई धरणातून जाणारे 5 टीएमसी पाणी उपयोगात आणण्यासाठी उपसा जलसिंचन योजनेबाबतही विचार करण्यात येईल.  सुसरी प्रकल्पासाठी 1.75 कोटी व धनपूर प्रकल्पासाठी 1.5 कोटींचा निधी देण्यात येईल. नवापूर एमआयडीसी क्षेत्रात फूड पार्क यशस्वी होणार असेल तर त्यासाठी निश्चितपणे निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ही बैठक समस्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आली असून दर तीन महिन्यांनी कार्यवाहीबाबत आढावा घेतला जाईल.  लोकप्रतिनिधींनी विकासाच्या दृष्टीने सूचना अवश्य मांडाव्यात, त्यावर सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  जिल्ह्यातील महामार्गांची स्थिती सुधारण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. बैठकीत आमदार पाडवी आणि नाईक यांनी जिल्ह्याच्या विविध समस्या मांडल्या.  यावेळी विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

हरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही – उद्योगमंत्री सुभाष देसाई

महायोजना शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना निश्चितच होणार फायदा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संत्रा लागवडीला चालना : शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करणार – कृषिमंत्री

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन प्रलंबित पर्यटन विकास कामांना गती देणार – राज्यमंत्री