औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचा ‘संविधान वाचवा, देश वाचवाचा’ गजर

औरंगाबाद- राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. संविधानिक तत्त्वांची मशाल घेऊन आज औरंगाबादमध्ये देशातील वाढत्या मनुवादी विचारसरणीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार , खा.सुप्रिया सुळे , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी महिला काँग्रसेच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, राष्ट्रवादी महिला काँग्रसेच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आ. राजेश टोपे, आ. प्रकाश गजभिये , आ. विक्रम काळे,शिक्षक आमदार, आ. सतीश चव्हाण उपस्थित होते.

संविधान वाचवा, देश वाचवा ही मोहीम आजच्या दिवसाला काळाची गरज होऊन बसली आहे. संविधानाबाबत सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे, त्यामुळे सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी बोलताना आ. अजित पवार यांनी दिला. तसेच सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत पवार यांनी सरकारच्या निष्क्रियतेचे वाभाडे काढले. मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी यावेळी भाष्य केले. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे दुष्काळ का जाहीर करत नाहीत हा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांना आणखी किती आत्महत्या हव्या आहेत? असा सवाल त्यांनी केला. मराठवाड्यात भारनियमनाचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. आघाडी सरकार असताना आदरणीयशरद पवार साहेबांच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य भारनियमनमुक्त करू असा निर्धार आम्ही केला होता. राज्य आम्ही भारनियमनमुक्त केले ही मात्र आताचे सरकार तसं करताना दिसत नाही, असेही ते म्हणाले.

देशाचे संविधान आम्ही कुणालाही बदलू देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस तसे कधीही होऊ देणार नाही. आदरणीय पवार साहेब, विधिमंडळ पक्षनेते अजित दादा, आम्ही सगळे आजपर्यंत केवळ संविधानावरच हात ठेवून पदाची शपथ घेतो, त्यामुळे या संविधानाला धक्का लागू देणार नाही, असे वक्तव्य खा. सुप्रिया सुळे यांनी केले. राज्यातील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत, सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार, वा मंत्री कुणीही महिला-मुलींबाबत अपमानास्पद बोलतील तर सुप्रिया सुळे कदापीही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

ज्या संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार दिले, तेच आज संकटात आहे. १९५० साली अस्तित्वात आल्यापासून संविधान वाचवण्याची भाषा देशात कधीही झाली नव्हती, मात्र आजच्या राज्यकर्त्यांमुळे संविधान वाचवा असं म्हणण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देशाची वाटचाल योग्यरितीने चालली होती. मात्र आज या संविधानावर घाला घातला जात आहे. काही वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी सरकारची पोलखोल केली म्हणून त्यांना घरी बसविण्यात आले. पत्रकारांची मुस्कटदाबी होतेय. संविधानाने दिलेला बोलण्याचा अधिकार हिरावून घेण्यात येत आहे. म्हणून संविधान वाचवण्यासाठी आज धडपड करावी लागत आहे. या देशातील जनताच लोकशाही वाचवेल, मतदानाचा मोठा हक्क जनतेच्या हातात आहे. त्यांनी त्याचा योग्य वापर करून या सरकारला धडा शिकवण्याचे काम जनताच करेल, असे मुंडे म्हणाले.

ज देशात महागाई प्रचंड वाढली आहे, सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. म्हणूनच आज जनता म्हणत आहे की, “महंगाई पोहोची हद्द के पार, नको रे बाबा मोदी सरकार”, असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान म्हणाल्या. जनता राज्यातील प्रश्नांना कंटाळली असताना सत्ताधारी मात्र खोटा प्रचार करत आहेत. सरकार हम करे सो कायदा अशा पद्धतीने काम करत आहे. आपल्या संविधानाचा पायाच ढासळण्याची भीती आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस याविरोधात मोठे आंदोलन उभारेल, असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या की, भारतीय संविधानाला अनेक वेळा परीक्षा द्यावी लागली आहे. ज्या संविधानाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिला त्या संविधानाला जाळण्याचा प्रयत्न देशात कधी नव्हे तो घडला. संविधानिक मूल्यांची रोज पायमल्ली होत आहे. राज्यात अल्पसंख्याक समाजातील लोकांवर अत्याचार होत आहेत, दलितांवरील अत्याचार वाढत आहेत, महिलांवर अत्याचार काही कमी होत नाहीत. हे सर्व होत असताना सरकार मात्र गप्प राहून याला मूकसमर्थन देत आहे, असा आरोप वाघ यांनी केला.

राष्ट्रवादीच्या रणरागिणी राम कदमांना भिडल्या; दाखवला इंगा