राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची भाजप कार्यालयावर धडक

मुंबई : वाढत्या महागाई विरोधात आणि सरकारच्या भुलथापांचा निषेध करण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादीच्या वतीने आज भाजपच्या मुंबईतील मुख्य कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गाजरं दाखवत सरकारच्या फसव्या आश्वासनांचा निषेध केला. दरम्यान पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे उग्र होऊ लागलेले आंदोलन हाणून पाडले.

या आंदोलनाबाबत बोलताना मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन अहिर म्हणाले की या सरकारचा कार्यकाळ आता संपत आला आहे. मागील साडे चार वर्षात या सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र या सरकारच्या योजनांचा जनतेला काहीच फायदा झाला नाही. सरकारने मागील चार वर्षांत रोजगार आणला नाही, गुंतवणूक आणली नाही. महागाई कमी करण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते मात्र सर्व गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत. चार वर्षांत या सरकारने संपूर्ण राज्याचा बट्ट्याबोळ केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली.