पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंत्रणांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवण्याचे आवाहन

मुंबई: शेंदरी बोंडअळीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाटया रोटाव्हेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात. येत्या खरीप हंगामापूर्वी शेतकरी त्याचबरोबर सर्व संबंधीत यंत्रणांनी संयुक्तपणे मोहीम स्वरुपात उपाय योजना केल्यास शेंदरी बोंडअळीचे उच्चाटन करणे शक्य होईल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.कापूस उत्पादनाशी निगडीत सर्व यंत्रणा म्हणजेच शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, कापूस पिक संशोधन संस्था, बियाणे उत्पादक कंपन्या, किटकनाशक कंपन्या, कापूस खरेदी केंद्रे (मार्केटयार्ड), गोडाऊन, जिनिंग/प्रेसिंग मिल्स इत्यादी संस्थांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन सहज शक्य आहे.

राज्यात सरासरी ४१.२९ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते. खरीप २०१७ मध्ये ४२.०७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली. त्यामध्ये बहुतांशी बीटी वाणांचा समावेश आहे. या खरीप हंगामात राज्यातील सर्वच कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये शेंदरी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे, अन्यथा आगामी काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान संभवते. त्यामुळे कृषी विभागाने शेतकरी बांधवांना शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापनासाठी विशेष आवाहन दिले आहे.

कापूस पिकाची फरदड, खोडवा घेऊ नका. कापूस पिकाची फरदड घेतल्यास किंवा कापूस पिकाचा हंगाम वाढविल्यास शेंदरी बोंडअळीसाठी नियमित खाद्य उपलब्ध होते. व किडीचे जीवनक्रम सतत पुढे चालू राहते. फरदडी पासून थोडेफार उत्पादन मिळतेच परंतु फरदड न घेता पऱ्हाटया रोटाव्हेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास तसेच शेंदरी बोंडअळीचे जीवनक्रम खंडित होण्यास मदत होते. व ज्या शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही कापूस आहे त्यांनी लागलीच शेतातील कापूस पिकाच्या पऱ्हाटया शेतात गाडून टाकाव्यात. जर शेत ५ ते ६ महिने कापूस विरहीत ठेवल्यास शेंदरी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते. परिणामी पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

कपाशीचा हंगाम संपण्याच्या शेवटी शेतातील कीड-रोगग्रस्त पाने, पाते, फुले व बोंडांमध्ये असलेल्या बोंड अळीच्या विविध अवस्था नष्ट करण्यासाठी शेतात शेळ्या, मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडवीत. कपाशीच्या पऱ्हाटयामध्ये किडीच्या सुप्त अवस्था तशाच राहतात. त्यामुळे त्यांची गंजी करून बांधावर ठेऊ नये. कपाशीच्या पऱ्हाटया, व्यवस्थित न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पऱ्हाटया शेतातून काढल्यानंतर त्यांची साठवणूक न करता त्या कांडी कोळसा/ इंधन ब्रिकेट्स तयार करण्यासाठी कारखान्यांना द्याव्यात. त्याचबरोबर पिक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीवर आलेल्या किडीचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील. सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी कपाशीनंतर हरभरा, गहू या सारख्या पिकांची फेरपालट करावी. त्यामुळे कापूस पिकाच्या उपलब्धते अभावी शेंदरी बोंडअळीच्या पुढील पिढ्या मर्यादित राहतील. कारण ही कीड केवळ कापूस पिकावरच उपजीविका करते.

सध्या वेचणी केलेला कापूस मार्केटयार्ड, जिनिंग/प्रेसिंग मिलमध्ये येत आहे. त्या ठिकाणीही शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनाची कार्यवाही होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कापूस खरेदी केंद्र (मार्केटयार्ड), गोडाऊन, जिनिंग/प्रेसिंग मिल्स या संस्थांना आवाहन करण्यात येते कि, त्यांनी सदर परिसरात कापसापासून तयार झालेला कचरा, सरकीतील अळ्या व कोष नष्ट करावेत. तसेच त्या ठिकाणी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावून त्यात अडकलेले पतंग नियमित गोळा करून नष्ट करावेत, अशा मार्गदर्शक सूचना कृषी विभागाने जारी केल्या आहेत.

कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिक आहे. व भारतातील कापूस पिकाखालील क्षेत्राचा विचार केल्यास त्यात महाराष्ट्राचा अग्रक्रम लागतो. याकिडीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची भूमिका अधिक महत्वाची आहे. त्यासाठी कृषी विभागाने यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.