नगरचे शेतकरी करणार शेतमालाचा ई लिलाव

अहमदनगर / भागवत दाभाडे : कानडा, टोमॅटोच्या बाजारभवाची स्थानिक बाजार समितीत घसरण होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पण आता अहमदनगरच्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातीलच नाही तर देशातील बाजार समित्यांमधील शेतमालाच्या लिलावात भाग घेता येणार आहे. त्यातून त्यांना देशातील ज्या शेती बाजाराला सर्वाधिक भाव आहे तेथे आपला शेतीमाल विकता येणार आहे.

शेतमालाच्या खरेदी विक्रीसाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत राष्ट्रीय कृषी बाजार (नाम) योजना सुरू करण्यात आली आहे.तसेच याच नावानेही पोर्टल सुरू करण्यात आले आहे.त्याद्वारे शेतकऱ्यांना ई- ट्रेडिंग करता येणार आहे.या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी देशातील बाजार समित्यांमध्ये जेथे सर्वाधिक भाव असेल तेथे आपला शेतीमाल विकू शकणार आहेत.या ई लिलाव प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता रहाणार आहे.शेतकर्यांच्या बँक खात्यात त्याच दिवशी थेट पैसे जमा करण्यासाठी ई- पेमेंटची सुविधा आहे.राष्ट्रीय स्थराच्या ई- बाजारामुळे जास्तीत जास्त व्यापारी लिलावात सहभागी होणार असल्याने शेतमालाच्या विक्रीबाबत स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यास योग्य व जास्तीत जास्त बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे.