समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या रखडलेल्या कामासाठी मनपा आणि युटिलिटी कंपनीची संयुक्त बैठक

औरंगाबाद- समांतर जलवाहिनी योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी मनपा आणि युटिलिटी कंपनीची संयुक्त बैठक विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत काल झाली. नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर, मनपाचे प्रभारी आयुक्त नवल किशोर राम तसेच शहरातील आमदार संजय शिरसाट, आमदार इम्तियाज जलील व आमदार अतुल सावे यांच्यासह युटिलिटी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. करारातील वार्षिक पाणीपट्टी वाढीची अट शिथिल करावी असे मत आमदारांनी बैठकीत या मांडले. तसेच समांतरच्या जुन्या करारात काही सुधारणा करण्याचे ठरले . यास युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील अनुकूलता दर्शवत नव्याने संयुक्त प्रस्ताव तयार करण्याचे ठरले.

महानगरपालिकेने दीड वर्षापूर्वी वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा समांतर जलवाहिनीचा करार रद्द केला होता . त्यानंतर युटिलिटी कंपनीने मनपाच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिल्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आणि लवादासमोर आहे. दीड वर्षापासून समांतर जलवाहिनी प्रकल्पाचे काम रखडले आहे.यामुळे शहराचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे.मनपाने या प्रस्तावास मान्यता दिल्यास तर दोन्ही पक्षांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात चालू असलेला खटला मागे घेतला जाईल व प्रत्यक्षात समांतरची वापसी शक्य होईल .