येत्या ४८ तासात धडकणार दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पाऊस

टीम महाराष्ट्र देशा : कोकण गोव्याच्या काही भागात व विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात कमालीचा उकाडा जाणवत आहे. येत्या ४८ तासात दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्र व मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, मॉन्सूनची वेगवान वाटचाल सुरू असून कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे.

दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागारात निर्माण झाल्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू आहे. केरळच्या आगमनानंतर कर्नाटकातील म्हैसूर कोडार्ईकँनल, तुतीकोरीन मध्ये मान्सूनने प्रवेश केला आहे.

तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यांमध्ये आगेकूच करण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. अंदमान, निकोबार, कर्नाटक किनारपट्टी, कोकण-गोवा, तामिळनाडू तसेच आसाम, मेघालय, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, विदर्भ मध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.