बैलगाडी शर्यतीवरील बंदी कायम; शर्यतीसाठी बैलांचा वापर अन्यायी – उच्च न्यायालय

मुंबई : बैलगाडी शर्यतींच्या आयोजनावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने आजही कायम ठेवली. बैल पळवण्यासाठी बनलेला नाही, शर्यतीसाठी त्यांचा वापर करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे. बैल घोड्यासारखा धावू शकत नाही. बैल हा सर्कशीतील प्राण्यांप्रमाणे तयार केलेला प्राणी नाही, असे मतही उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

सुनावणी दरम्यान राज्य सरकारकडून काढण्यात आलेली अधिसूचनाही न्यायालयाने फेटाळली. तामिळनाडूमधील जलीकट्टूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बंदी घातलेली बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत होती. यावर राज्य सरकारनेही विधेयक तयार करून त्यावरील नियमावली तयार करून कायद्यात रूपांतर केले. याला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूरी देण्यात आली.