पाण्यावरून राजकारण नको ; उदयनराजे भोसले

“आपण पाण्यावरून कधीही राजकारण केले नाही. मुळात पाण्यावरून कोणीच राजकारण करू नये, या मताचा मी आहे. हे पाणी ज्यांच्या हक्काचे आहे त्यांना ते दिलेच पाहिजे, यात कसले राजकारण करता” असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांनी पंढरपूर मध्ये केला.

खासदार उदयनराजे भोसले गुरुवारी (ता. १४)पंढरपूर, सांगली दौऱ्यावर होते.त्यांनी लाटेवाडीतील चारा छावण्याला भेट दिली.त्यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.त्यांनी रात्री पंढरपुरात विठ्ठल रुक्मिनीचे दर्शन घेतले. विठ्ठलाला काय साकडे घातले, असे विचारले असता भोसले म्हणाले, मी कुठलेही राजकारण करण्यासाठी बसलो नाही, जनतेची सेवा मला करायची आहे. लोकशाहीचे तुम्ही सर्व राजे आहात. त्यामुळे आपण दुष्काळासंबंधी निर्णय घ्यायला पाहिजे.

आजही बँकात उद्योजकांचे स्वागत होते. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची हेटाळणी होते. जोपर्यंत या देशातील शेतकरी सधन व सक्षम होणार नाही, तोपर्यंत हा देश महासत्ता बनणार नाही. ८० टक्के जनता ही शेती व शेतीपूरक व्यवसाय यावर अवलंबून आहे. २० टक्के जनता ही उद्योग-व्यवसायात आहे. त्यांचा उत्पादित माल विकत घेण्यासाठी ८० टक्के जनतेची आर्थिक क्षमता वाढणे गरजेचे आहे. शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे. तो कोलमडला तर देशाचे तुकडे होतील हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.