नोकियाच्या विविध मॉडेल्सवर जंबो सवलत

सणासुदीच्या कालखंडात नोकिया कंपनीने विविध स्मार्टफोन्सवर कंपनीने अतिशय आकर्षक अशा सवलती जाहीर केल्या आहेत.

भारतीय बाजारपेठेत दसरा व दिपावलीच्या कालखंडात सर्वाधीक खरेदी होत असते. अर्थात स्मार्टफोनही याला अपवाद नाहीत. सध्या स्मार्टफोन्सची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू असून ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी कंपन्यांनी नवनवीन ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यात एचएमडी ग्लोबलची मालकी असणार्‍या नोकिया ब्रँडने दरातील कपातीचा मार्ग पत्करला आहे. नोकियाने आता ऑफलाईन पध्दतीत म्हणजेच शॉपीजमधून स्मार्टफोन्स खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी दरातील कपात जाहीर केली आहे. ही कपात १ ते १३ हजार रूपयांच्या दरम्यानची आहे. यातील सर्वाधी १३ हजारांची कपात नोकिया ८ सिरोक्को या फ्लॅगशीप मॉडेलमध्ये करण्यात आली आहे. आजवर हे मॉडेल ४९,९९९ रूपयात मिळत होते. आता यालाच ३५,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. या घसघशीत सवलतीमुळे ग्राहकांचा लाभ होणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे वन प्लस ६ सारख्या याच किंमतपट्टयातील मॉडेलला यामुळे तीव्र स्पर्धा निर्माण होणार असल्याचे मानले जात आहे. यानंतर नोकिया ६.१ (३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंट) या मॉडेलचे मूल्य दोन हजारांनी कमी करण्यात आले आहे. याचे आधीचे मूल्य १५,४९९ होते तर आता याला १३४९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. याच स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटसाठीही १००० रूपयांची सवलत देण्यात आली आहे. आधी हे मॉडेल १७,४९९ रूपयात मिळत होते. तर आता याला १६,४९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. तर नोकिया ५.१चे ३ जीबी रॅमयुक्त व्हेरियंटचे मूल्य १५०० रूपयांनी कमी करण्यात आले आहे. याचे मूल्य १४,४९९ रूपये असून याला १२,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहे.

वर नमूद केल्यानुसार ही दरकपात फक्त ऑफलाईन खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजेच नोकियाच्या शॉपीजमधून वा अन्य स्टोअर्समधून खरेदी करणार्‍याला ही सवलत मिळेल. मात्र, ऑनलाईन पोर्टल्सवर आधीच्याच मूल्यात हे मॉडेल्स उपलब्ध आहेत. यामुळे या रणनितीच्या माध्यमातून आपल्या ऑफलाईन ग्राहकांना आकर्षीत करण्याचा नोकियाचा हेतू असल्याचे स्पष्ट झाले आहे.