नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास बांधील – गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील

जळगाव – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासन बांधील आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी काल सकाळी जामनेर तालुक्याचा दौरा करून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांचेसोबत माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन, सामाजिक कार्यकर्ते संजय गरुड यांच्यासह पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री श्री. पाटील यांनी काल सकाळी जामनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, हिंगणे न क व तोंडापूर येथील नुकसानग्रस्त शेतातील पिकांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले,
चाळीसगाव व जामनेर तालुक्यातील शेतीच्या नुकसानी संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. राज्याच्या पुनर्वसन मंत्र्यांनी पंचनाम्यात वेळ न घालवीता तत्काळ मदतीचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. पीक विमा नुकसानीचे प्रस्ताव ऑनलाईन होण्यात तांत्रिक अडचण येत असल्याने ऑफलाईन स्वीकारले जातील. याबरोबरच राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत देण्यास बांधील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी या दौऱ्यात नुकसान झालेल्या पिकांची तसेच पडझड झालेल्या घरांची पाहणी करुन यंत्रणेला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. आमदार श्री. महाजन यांनीही वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे सांगून मदतीचे आश्वासन दिले. यावेळेस तहसीलदार अरुण शेवाळे, जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. व्ही. कवडदेवी, कृषीसह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –