नाशकात औषध फवारणीमुळे वृद्ध शेतक-याचा मृत्यू

नाशिक: पिकांवर कीटकनाशक औषधांची फवारणी करीत असताना औषधाची मात्रा शरीरात गेल्याने ६० वर्षीय शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक तालुक्यातील मातोरी येथे घडली़ मात्र शरीरात औषधाचे प्रमाण जास्त असल्याने ही आत्महत्या असल्याचा अंदाज वैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केला. निवृत्ती दामू पिंगळे (रा. मातोरी, दरी रोड, ता. जि. नाे मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव आहे़ नाशिक शहराजवळील मातोरी-दरी रोडवर निवृत्ती पिंगळे यांची शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी मिरची तसेच कोबीचे रोप टाकलेले असून दुपारी १ वाजेच्या सुमारास कोबीच्या रोपाला कोडायझन नावाच्या औषधाची फवारणी निवृत्ती पिंगळे करीत होते. रोपावर औषधाची फवारणी करीत असताना त्यांना औषधाचा त्रास होऊ लागल्याने मुलगा पोलीसपाटील रमेश पिंगळे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर औषधोपचार सुरू असताना दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून घोषित केले.

दरम्यान, या मृत्यूची नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मात्र हा मृत्यू संशयास्पद असल्याची शक्यता जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी व्यक्त केली आहे. पिंगळे यांच्या शरीरात कीटकनाशकाचे प्रमाण अधिक आढळून आल्याने तोंडावाटे अगर इतर अवयवांमार्गे गेले तर याचे प्रमाण अत्यल्प असते. मात्र पिंगळेंच्या पोटात हे प्रमाण अधिक असल्याने त्यांनी विष प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकार्यांनी व्हिसेरा राखून ठेवला असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.