कट्टर राजकीय वैर मिटण्याच्या वाटेवर?

संदीप कापडे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात पाऊण तास चर्चा झाली होती. मात्र या चर्चेत काय झाल याचा तपशील काही बाहेर आला नव्हता. राजू शेट्टी यांनी दिल्ली मध्ये जाऊन पवार यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी भेट घेतली होती. शरद पवार आणि राजू शेट्टी हे कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक होते. मात्र राजकारणात मित्रत्व आणि शत्रुत्व पत्करायला वेळ लागत नाही. हे यांच्या वाढलेल्या घनिष्ट साबंधामुळे स्पष्ट होत आहे. या दोन राजकीय नेत्यांच्या एकत्रित येण्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधान आलं आहे. मात्र राजकारणात अव्वल राजकीय खेळाडू असणाऱ्या शरद पवारांमुळे राजू शेट्टींचे अस्तिव कमी होणार का? शेतकरी नेते राजू शेट्टी यांची भूमिका योग्य आहे का? किंवा आगामी निवडणुका बघता राजकीय स्वार्थ साधण्यासाठी दोन नेते एकत्रित येत आहेत का? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण होत आहेत.

राजू शेट्टी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात निवडून आले होते. नंतर शिरोळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येताना राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव केला होता. २००९ मध्ये राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभूत करून धक्का दिला होता. कदाचित तेव्हापासून राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचामध्ये मतभेद, राजकीय वैर वाढले. गेले १० वर्ष शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यातील राजकीय वैर महाराष्ट्राने अनुभवले आहे, मात्र शेट्टींनी भाजपप्रणित “एनडीए’ सोडल्यापासून या दोन्ही नेत्यांतील कटुता कमी होऊन गोडवा वाढू लागला आहे. हा गोडवा टिकेल कि नाही? याबाबत संभ्रम आहे.

भाजप हा मित्र पक्षांना कमी लेखत असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सर्वप्रथम शेतकरी संघटनेने सोडली. शिवसेनेनेही आगामी काळात भाजपशी युती करण्यास नकार दिला. तसेच तेलगू देसमही भाजपशी संघर्ष करत आहे. त्यामुळे भाजपला आगामी निवडणुकीत सत्ता मिळविणे अवघड जाणार असल्याच राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं होत. प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीत कट्टर विरोधक असलेले शरद पवार आणि राजू शेट्टी एकत्र पाहायला मिळाले. या दोन्ही दिग्गज नेत्यांमधील राजकीय वाद मिटला असून संभाव्य आघाडी होणार का अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. याबाबत अजित पवारांनी सुद्धा सूचक विधान करत राजकीय जीवनात बदल होत असतात, असं अजितदादांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राजू शेट्टी आणि शरद पवार हे आगामी काळात एकत्र दिसणार का याबाबतची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

या दोन नेत्यांमध्ये वैर निर्माण होण्यास साखर कारखाने हा मोठा विषय होता. शेट्टी संसदेत गेल्याने त्यांची ताकद आणि संघटना वेगाने वाढली होती. साखर कारखानदार मुख्यत: राष्ट्रवादीचे आमदार, खासदार असल्याने शेट्टींचा राष्ट्रवादीशी जोरदार संघर्ष व्हायचा. शरद पवार हे साखर कारखानदारांचे नेते आणि राजू शेट्टी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेते असल्याने यांच्यात कधी पटलच नाही. शेट्टी साखर व्यवसायातील शोषण, भ्रष्टाचारावर हल्लाबोल करत असतांना पवारांवरही तुटून पडत. त्यामुळे आगामी काळात राजू शेट्टीची भूमिका बदलणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. शरद पवारांनी २००९च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना हरवण्यासाठी सर्व ताकदीने प्रयत्न केले होते. मात्र शेतकऱ्यांच्या ताकदीवर शेट्टी खासदार झाले. असाच प्रकार २०१४च्या लोकसभेला घडला. शेट्टींना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीने हातकणंगले मतदारसंघ कॉंग्रेसला दिला होता. शेट्टींच्या विरोधात “त्यांच्या जातीचा’ उमेदवार दिला, तरी शेट्टी पडले नाहीत.

sugar-cane

ज्या कोल्हापुरात काहीदिवसांपूर्वी शरद पवारांनी शेट्टींवर स्तुतिसुमने उधळत ‘राजू शेट्टींनी आमच्यावरही प्रेम केलं. पण सत्तेतील लोकांची धोरणे चुकली तर त्यावर हल्ला हा करावाच लागतो, त्याशिवाय बदल होत नाही, हे काम श्री.शेट्टी यांनी केले’ अस वक्तव्य केलं होत. त्याच कोल्हापुरात एकेकाळी कोल्हापूर-सांगलीच्या बाहेर साखर कारखानदारांशी संघर्ष सुरु होता. तेव्हा संसदेत स्थान मिळाल्याने राजू शेट्टींचे पारडे जड होते. बारामती पट्ट्यातही ऊस आंदोलन पेटले होते, ते थांबायचे नाव घेत नव्हते. त्यावेळी पवार यांनी “कोण कुठला राजू शेट्टी?’ असे म्हणत त्यांची जात काढल्याचे प्रकरण जबरदस्त गाजले होते. कधीकाळी शेट्टींची जात काढणारे शरद पवार साहेब आज त्यांचे कौतुक करत आहेत. आगामी काळात राजकीय वाटचाल कशी करायची हे राष्ट्रवादीने जवळपास निश्‍चित केले आहे. भाजपबरोबर जायचे नाही, हे त्यांनी ठरवले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपविरोधातील सर्वजणांना बरोबर घेण्याची भूमिका ठेवली आहे. त्याचाच परिपाक म्हणून कोल्हापूर-सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते शेट्टींच्या संपर्कात आले. त्यानंतर स्वत: पवारांनी शेट्टींना शेतकरी नेते म्हणून बळ मिळेल, अशी विधाने केली आहेत.

sharad pawar

शरद पवार विरोधाने बहरत गेलेलं राजू शेट्टी याचं राजकारण पवार साहेबांच्या जवळकीने त्याच गतीत सुरु राहील कि शेट्टींच्या अस्तीवातला धोका निर्माण होईल. तसेच शरद पवार याचं भाजप विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचं धोरण यशस्वी होणार का? तसेच या दोन नेत्यांच्या एकत्र येण्याची चर्चा जरी सध्या सुरु असली तरी शरद पवारांनी आतापर्यंत तरी स्पष्ट केलं नाही. याबाबत पवारांची भूमिका स्पष्ट झाल्यावर त्यांची भविष्यातील वाटचाल स्पष्ट होईल.