पावसामुळे तिसऱ्या यादीतील अकरावी प्रवेशांसाठी एक दिवसाची मुदतवाढ – शिक्षणमंत्री

शिक्षणमंत्री

मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर पाहता अकरावीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत एक दिवसाने वाढवून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी जाहीर केला आहे.

आता ही प्रवेशप्रक्रिया ५ ऑगस्टऐवजी ६ ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु असणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी घाई करुन पावसात बाहेर पडू नये, असे आवाहनही शिक्षणमंत्र्यांनी केले आहे. सकाळी पावसाचा जोर पाहून तातडीने शिक्षणमंत्री अॅड. शेलार यांनी ट्विट करून ही मुदतवाढ जाहीर केली. सोबतच अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरही यासंदर्भातील सूचना ही देण्यात आल्या आहेत.

१ ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची मुदत ही ५ ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यंत फी आणि कागदपत्रे सादर करावी लागणार होती. आता पावसाने एक दिवस वाया जाऊ नये म्हणून पालक घाई करण्याची शक्यता होती. सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयात पोहोचणे अशक्य झाले.

या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी जोखीम घेण्याची वेळ येऊ नये म्हणून शिक्षण विभागाला वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देश देऊन शिक्षणमंत्र्यांनी ही मुदत एका दिवसाने वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

पाच वर्षातील कामाचे मूल्यमापन करूनच विद्यमान आमदारांना तिकीट – मुख्यमंत्री

एक झाड लावून चार वर्षे त्याची जोपासना केल्यानंतरच विद्यार्थ्यांना पदवी

पालेभाज्या आणि त्याचे फायदे