कर्जमाफीचा अर्ज न भरताच शेतकरी ‘लाभार्थी’!

टीम महाराष्ट्र देशा: शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाइन चालू असलेला घोळ संपता संपेना. आधी कर्जमाफीचा आर्ज न भरताच शिवसेनेच्या आमदाराला कर्जमाफी मिळाली होती. त्यानंतर अनेक वादविवाद राजकीय वर्तुळात पाहायला मिळाले. आणि आता थेट शेतकऱ्यालाच कर्जमाफी मिळाली आहे. विशेष म्हणजे त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर कुठलेही कर्ज नसताना आणि कर्जमाफीसाठी अर्ज देखील दाखल केला नसताना कर्जमाफी झाली कशी असा सवाल आता उपस्तीत केला जात आहे.

पाथरी तालुक्यातील विटा येथील रामेश्वर रावसाहेब आरबाड यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे नाही. त्यांनी कर्जमाफीसाठी अर्जही केलेला नाही. असे असतानाही त्यांना परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत संपूर्ण कर्ज माफ करण्यात आल्याचा मेसेज पाठवला आहे. हा मेसेज पाहून आरबाड यांना धक्काच बसला. कर्ज न घेताही ते माफ झाल्याचे पाहून ते चक्रावून गेले. त्यांनी बँकेकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे देखील त्यांना कोणतेही ठोस उत्तर मिळू शकले नाही. परभणी जिल्हा बँकेकडून सदस्य शेतकऱ्यांना खातरजमा न करताच कर्जमाफी झाल्याचे मेसेज पाठवण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.