कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – सुभाष देशमुख

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दि. १८ ऑक्टोबर २०१७ पासून सुरु करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करू नये, असे आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

कापूस हंगाम २०१७ -२०१८ मध्ये कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात झाले असून शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघ व कॉटन कॉपोर्रेशन ऑफ इंडियाच्या वतीने हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यासाठी राज्यात पणन महासंघाचे ६० खरेदी केंद्र आणि सी. सी. आय (कॉटन कॉपोर्रेशन ऑफ इंडिया) चे १२० खरेदी केंद्र सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा दर्जेदार कापूस बाजारपेठेत आणावा. चांगल्या प्रतीचा कापूस माफक आर्द्रतायुक्त असावा याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी.

दर्जेदार कापसाची हमी भावाने खरेदी केली जाईल. केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने कापसाच्या विविध जातींचे दर जाहीर केले आहेत. ब्रम्हा जातीच्या कापसासाठी ४ हजार ३२० रुपये प्रती क्विंटल, एच – ६ जातीच्या कापसासाठी ४ हजार २२० रुपये प्रती क्विंटल एल आर ए जातीच्या कापसासाठी ४ हजार १२० प्रती क्विंटल असे हमी भाव जाहीर केले आहेत. चांगल्या प्रतीचा कापूस योग्य दारात विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.