बिगर नोंदणीकृत औषध दुकानांवर कारवाई सुरू

सोलापूर: विविध पिकांच्या वाढीसाठी खत विक्री दुकानांतून कीटकनाशके वा पिकांच्या वाढीची संजीवके विक्री केली जात आहेत. मात्र यामध्ये दुकानदारांनी बिगर नोंदणीकृत कीटकनाशकांची विक्री करू नये. अशा प्रकारची संजीवके वा कीटकनाशके विक्री होत असल्यास त्या दुकानांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. यासाठी तालुकानिहाय भरारी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी दिली. पीकवाढीसाठी विविध औषध फवारणीने विदर्भात अनेक शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर जिल्हा कृषी कार्यालयाने तालुका कृषी कार्यालयांना तालुक्यातील कृषी दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

आदेशामध्ये खरीप हंगामात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अद्याप सादर केला नाही. शिवाय रब्बी हंगाम सुरू झाला असून, यासाठी भरारी पथकांकडून तपासणी करून विविध प्रकारच्या कीटकनाशकांची तपासणी करावी. यामध्ये बिगर नोंदणीकृत पीक वाढ संजीवके, इतर उत्पादनांची विक्री दुकानातून होत असल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करावी, असे आदेश आहेत. ऑक्टोबर महिन्यात द्राक्षांची छाटणी फवारणी केली जाते. तर तुरीचे पीक फुलोऱ्यात असल्याने अळीपासून बचाव करण्यासाठी विविध कीटकनाशकांची फवारणी केली जाते.

कीटकनाशक फवारणीबाबत अधिक सुरक्षितता बाळगण्यासाठी कृषी कार्यालयांकडून माहितीपुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी तालुकास्तरावर व्यापक मोहीम घेऊन शेतकरी, खत विक्रेते यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर घेण्याचे आदेश पीकवाढ संजीवके वा कीटकनाशके फवारणी करताना कोणती कीटकनाशके खरेदी करावी, याबाबत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर घ्यावे. शिवाय उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांना प्रशिक्षण द्यावे. कीटकनाशकांच्या वापरामुळे कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक बिराजदार यांनी केले आहेत.